भारतीय संघाचा कर्णधार तसंच मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएलच्या या हंगामात काही खास कामगिरी करु शकला नाही. मुंबईचा संघ या आयपीएल हंगामातून सर्वप्रथम बाहेर पडला. रोहितला न विचारताच मुंबईनं त्याला कर्णधार पदावरुन काढून टाकलं. त्यामुळे संघात वाद-विवाद देखील पाहायला मिळाले.
काही दिवसांपूर्वी रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता. त्यात तो केकेआरचे प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत काही वैयक्तिक चर्चा करताना दिसत होता. आयपीएल ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ यांनी दाखवलेल्या या व्हिडिओमुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. रोहित पुढच्या हंगामात केकेआरमध्ये जाणार का? अशा चर्चा देखील सर्वत्र होऊ लागल्या होत्या. त्यामुळे रोहित खूप चिडला होता.
19 मे रोजी रोहितनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर स्टार स्पोर्ट्सला फटकारलं होतं. विरोध करूनही चॅनलनं त्याचा वैयक्तिक व्हिडिओ प्ले केल्याचं रोहितनं म्हटलं होतं. आता यावर स्टार स्पोर्ट्सनं उत्तर दिलं आहे. चॅनलनं एक निवेदन जारी करत म्हटलं की, “भारताच्या एका सीनियर खेळाडूच्या क्लिपची कालपासून सोशल मीडियावरती खूप चर्चा होत आहे. ही क्लिप 16 मे रोजी वानखेडे स्टेडियमवरची आहे. ही क्लिप सरावादरम्यान रेकाॅर्ड केली होती. असं करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सकडे अधिकार आहेत. व्हिडिओमध्ये एखादा सीनियर खेळाडू त्याच्या मित्रांसोबत गप्पा-गोष्टी करताना दिसतो. या व्हिडिओ क्लिपमध्ये आम्ही कोणताही ऑडिओ रेकाॅर्ड केलेला नाही. तसेच तो कोणत्याही लाईव्ह टीव्हीवरती दाखवला देखील नाही. आम्ही जगभर क्रिकेटचं प्रक्षेपण करत असताना सर्व नियमांचे पालन करतो.”
वास्तविक, आयपीएल दरम्यान रोहितचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे हिटमॅन संतापलेला दिसतोय. असाच एक व्हिडिओ ब्रॉडकास्टर चॅनलनं प्ले केला होता, ज्यामध्ये रोहित मुंबई संघाचा माजी खेळाडू धवल कुलकर्णी आणि इतरांसोबत बोलत होता. त्यानंतर रोहितनं कॅमेरामनला रेकॉर्डिंग न करण्यास सांगितलं होतं. व्हिडिओमध्ये रोहित स्वतः म्हणत होता की, “भाऊ, ऑडिओ बंद करा. एका ऑडिओनं माझी वाट लावली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ 5 कारणांमुळे ‘थाला’ची टीम आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहचू शकली नाही; जाणून घ्या