मुंबई:- मिड लाईन स्पोर्टस्, श्रीराम कबड्डी संघ, ओम् पिंपळेश्वर, गोलफादेवी यांनी अमरहिंद मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत बाद फेरी गाठली. यांच्या बरोबरीने अंकुर स्पोर्टस्, विजय क्लब, गोलफादेवी, बाबुराव चांदेरे, विजय स्पोर्टस् क्लब, बंड्या मारुती, लायन्स स्पोर्टस् हे संघ देखील बाद फेरीत दाखल झाले. दादर, गोखले रोड(प.) येथील मंडळाच्या पटांगणातील मॅट वर सुरू असलेल्या स्व. उमेश शेणॉय स्मृती चषक कबड्डी स्पर्धेच्या ई गटात पालघरच्या श्रीराम संघाने उपनगराच्या ओवळी मंडळावर ४१-३५ अशी मात करीत बाद फेरीचा आपला मार्ग खुला केला. पूर्वार्धात लोण देत २१-११ अशी आघाडी घेणाऱ्या श्रीरामला उत्तरार्धात मात्र ओवळीने विजयासाठी चांगलेच झुंजविले.
श्रीराम कडून प्रतीक जाधवने ३१ चढयात १बोनस व झटापटीत १७ असे एकूण १८गुण मिळवित श्रीरामच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. उत्तरार्धात २वेळा त्याची पकड झाली. त्याला नीरज सरोजने १७ चढायात ४+१ गुण घेत, तर सर्वेश फटकारे यांनी ५ पकडी करीत उत्तम साथ दिली. उत्तरार्धात प्रतिकला झालेल्या पकडीचां फायदा घेत ओवळीने सामन्यात रंगत आणली. पण विजय त्यांच्या नशिबी नव्हता. त्यांच्या अमनने १४ चढाया करीत ६ गुण घेतले, पण ५वेळा त्याची पकड झाली. चिराग सिंग, गौरव पानसरे ने त्याला बऱ्यापैकी साथ दिली. मिड लाईनने अ गटात जय दत्तगुरुला ३०-२२असे पराभूत केले. पहिल्या डावात लोण देत १७-०९ अशी आघाडी घेणाऱ्या मिड लाईनने उत्तरार्धात औपचारिकता पूर्ण करीत हा विजय साकारला. त्यांच्या धीरज बैलमारेने २२ चढायात ६गुण घेतले. त्याला वैभव मोरेने ४पकडी करीत छान साथ दिली. दत्तगुरुच्या गौरव माटल, आकाश उपाध्याय यांच्याकडून फारसा प्रतिकार झाला नाही.
उपनगराच्या चेंबूर क्रीडा केंद्राने ब गटात मुंबईच्या ओम् पिंपळेश्वरचा ६०-२९असा फडशा पाडला. पण गुण फरकाच्या नियमानुसार त्यांना साखळीतच गारद व्हावे लागले. चांदेरे फाऊंडेशन बरोबर मोठ्या फरकाने पराभूत झाल्याचा फटका त्यांना बसला. पिंपळेश्वरने मात्र पराभूत होऊन देखील बाद फेरी गाठली. गोलफादेवीने ई गटात मध्यांतरातील १९-२२ अशा पिछाडी वरून जय भारत संघाचे आव्हान ३८-३३ असे परतवून लावले. मुंबईच्या दोन संघातील हा सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. कारण यात विजयी होणारा संघ बाद फेरीत जाणार होता. सिद्धेश पिंगळे, धनंजय सरोज, जयेश बोरशी यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अनिकेत मिटके, निखिल पाटील, अविनाश कावीलकर यांनी जय भारत कडून शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. विजय क्लबने क गटात अंकुरला ४१-३७ असे चकविले. पण दोन्ही संघ बाद फेरीत दाखल झाले. कार्तिक मिश्रा, अजिंक्य कापरे, आयुष साळवी विजय कडून, तर अभिमन्यू पाटील, सचिन राऊत, अमीर शेख अंकुर कडून उत्कृष्ट खेळले. शेवटच्या ड गटातील विजयी उपविजयी ठरविण्याकरीता झालेल्या सामन्यात बंड्या मारुतीने लायन्स स्पोर्टस् चा ३९-३४ असा पराभव केला. (State Level Kabaddi Tournament. Mid Line Sports, Sriram Kabaddi Team, Om Pimpleswar, Golfadevi Enter Knockout Round)
महत्वाच्या बातम्या –
शोएब मलिकच्या सख्या बहिणीचा मोठा खुलासा, ‘त्याची खूप लफडी होती’
Sania Mirza । शोएब मलिकने केलं तिसरं लग्न, दुसरी पत्नी सानिया मिर्झा म्हणाली….