भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोमवारी (१५ ऑगस्ट) देशभरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ भारतीयच नव्हे तर भारतावर प्रेम करणाऱ्या विदेशी लोकांनी देखील भारतीयांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक आजी-माजी क्रिकेटपटू यात सामील होते. त्याचवेळी अनेक वर्ष भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी देखील भारतीयांना सोशल मीडियावरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, या शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडून एक मोठी चूक घडली.
स्टीफन कॉन्स्टेनटाईन सध्या भारतातच आहे. नुकतीच त्यांची कोलकात्यातील प्रमुख क्लब असलेला ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी एक ट्विट करत या शुभेच्छा दिल्या. मात्र, ते देत असताना त्यांनी भारताचा चुकीचा नकाशा पोस्ट केला. स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी पोस्ट केलेल्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरचा भाग दिसत नव्हता. त्यांची ही चूक काही चाहत्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर त्यांनी तात्काळ माफी मागत ते ट्वीट हटवले. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांना भारताचे आजवरचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक मानले जाते. ५९ वर्षाच्या कॉन्स्टेनटाईन यांनी दोन वेळा भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवलेले. यादरम्यान भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत १७३ पासून ९७ व्या क्रमांक पर्यंत झेप घेतली होती. आगामी इंडियन सुपर लीगमध्ये ते पुन्हा एकदा प्रशिक्षक म्हणून मैदानावर दिसणार आहेत.