तीनवेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने या हंगामात खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिस याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळपट्टीवर टिकून खेळूनही कर्णधार एमएस धोनी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला होता. धोनी हा मध्यम फळीतील किंवा तळातील फलंदाज आहे, असे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटले आहे. त्याने अष्टपैलू रवींद्र जडेजाचे कौतुक केले आहे.
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग फलंदाजीच्या क्रमाबद्दल बोलताना म्हणाले, “केदार जाधव चौथ्या क्रमांकावर येणारा फलंदाज आहे, धोनी हा मुख्यत: मधल्या फळीतील फलंदाज आहे. जर आमच्या सलामीवीरांनी चांगली फलंदाजी केली, तर धोनीला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर संधी मिळू शकते. आणि केदार धोनीनंतर फलंदाजीला येऊ शकतो. परंतु आमच्या सलामीच्या फलंदाजांनी अद्याप काही खास कामगिरी केली नाही.”
शुक्रवारी (2 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पहिल्या डावात 5 बाद 164 धावा केल्या, प्रत्युत्तरात चेन्नईची सुरुवात खराब झाली आणि संघाने 26 धावांवर २ गडी गमावले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला केदार 10 चेंडूत 3 धावा करुन तंबूत परतला आणि त्यानंतर धोनी फलंदाजीसाठी आला होता. त्यानंतर धोनीने अष्टपैलू जडेजासोबत मिळून पाचव्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली होती.
जडेजाच्या खेळीविषयी बोलताना फ्लेमिंग म्हणाले, “जडेजाने हैदराबादविरुद्ध चांगला डाव खेळला, संघ अडचणीत होता त्यामुळे धोनी आणि जडेजाला खेळपट्टीवर थोडा वेळ घालवावा लागला. आमचा संघ सामना जिंकण्याच्या अगदी जवळ आला होता पण आम्हाला सामना गमवावा लागला.”