इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. यापूर्वी हा हंगाम मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोना संक्रमाणामुळे स्थगित करण्यात आला होता. पण आता युएईमध्ये पुन्हा एकदा हा उर्वरित हंगाम दुसऱ्या टप्प्यात सुरु होत आहे. या दुसऱ्या टप्प्यातील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा रंगणार आहे. तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तीन वेळा इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटले आहे की, यावर्षी आयपीएल दोन भागांमध्ये खेळवले जात आहे, ज्यामुळे आम्हाला एका वेगळ्या आव्हानाला सामोरे जावे लागले आहे. ही एक नवीन सुरुवात असेल. आयपीएलचा दुसरा टप्पा रविवारी सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने सुरू होईल.
या महत्त्वपूर्ण सामन्याआधी फ्लेमिंग यांनी एका वाहिनीला सांगितले की, ‘आम्हाला पुन्हा चांगली सुरुवात करायची आहे. पुढील सामने जिंकण्यासाठी आमच्या खेळाडूंना फॉर्ममध्ये असणे आवश्यक आहे. आम्हाला इथे नवीन सुरुवात करायची आहे आणि एका नवीन स्पर्धेसारखी बघायची आहे.’
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई आणि धोनीच्या चेन्नईमधील स्पर्धेबद्दल बोलताना फ्लेमिंग म्हणाले, ‘आम्ही आयपीएलचा पहिला टप्पा हा पराभवाने संपवला होता, त्या सामन्यात पोलार्डने आयपीएलमधील शानदार खेळी खेळली होती. मुंबई आमच्याविरुद्ध चांगले खेळते, त्यामुळे आम्हाला खेळाची पातळी आणखी वाढवावी लागेल.’
न्यूजीलंडचा माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला की, ‘प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून, हा खेळ चांगल्या पद्धतीने खेळला जावा जेणेकरून आम्हला कळेल की काय करावे आणि संघ कोठे आहे. म्हणून, नेहमीप्रमाणे, आम्ही त्यासाठी तयार आहोत आणि ही एक चांगली लढत असेल.’
तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. दिल्लीने आठपैकी सहा सामने जिंकत १२ गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल चेन्नईचा संघ आहे त्यांनी १० गुण मिळवले आहेत, तर तिसऱ्या स्थानी आरसीबीचा संघ आहे त्यांनी १० गुण मिळवले आहेत. पण, आरसीबीचा नेटरनरेट सीएसकेपेक्षा कमी असल्याने ते तिसऱ्या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी आठ गुण मिळवून मुंबईचा संघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई-चेन्नई सामन्यादरम्यान कसे असेल हवामान, कोणाला होऊ शकतो फायदा; घ्या जाणून
चेन्नईला अव्वल स्थान गाठण्याची संधी, तर मुंबई आरसीबीला टाकू शकते मागे, पाहा गुणतालिकेचे समीकरण
आरसीबीसाठी खेळताना ‘या’ युवा खेळाडूने जिंकला विराटचा विश्वास, भविष्यात पंत-किशनला देईल टक्कर