पॅट कमिन्सच्या अनुपस्थित स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने ऍशेस मालिका २०२१ (Ashes Series 2021) मधील दुसरा कसोटी सामना (Second Test) २७५ धावांनी जिंकला आहे. १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्यात पहिल्याच दिवसापासून ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले होते. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतही २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामना विजयासह कर्णधार स्मिथच्या नावे कसोटीतील मोठ्या विक्रमाचीही नोंद झाली आहे.
ऍडलेड येथे झालेला हा सामना दिवस-रात्र स्वरुपात खेळवला गेला होता. या सामन्यातून स्मिथने कसोटी संघाचा कर्णधार म्हणून संघात पुनरागमन केले होते. यापूर्वी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे त्याच्या हातून संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे काढून घेण्यात आली होती. मात्र जवळपास ३ वर्षांनंतर कसोटी संघाची कमान सांभाळताना त्याच्या नेतृत्त्वात कसलीही कमी जाणवली नाही.
गुलाबी चेंडूने खेळवल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे पाहुण्या इंग्लंडने नांगी टाकली. जेम्स अंडरसन, स्टुअर्ट ब्रॉड असे एकाहून एक सरस इंग्लिश गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कमी धावसंख्येवर अडवू शकले नाहीत. पहिल्या डावातील मार्नस लॅब्यूशेनचे शतक, डेविड वॉर्नरच्या ९५ धावा आणि स्मिथची ९३ धावांची कर्णधार खेळी ऑस्ट्रेलियासाठी फायद्याची गोष्ट ठरली. या खेळींच्या जोरावर त्यांनी पहिल्या डावातच इंग्लंडपुढे ४७३ धावांचे मोठे आव्हान ठेवले.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २३६ धावाच करू शकला. इंग्लंडकडून डेविड मलानने ८० व कर्णधार जो रूटने ६० धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विशेष प्रदर्शन करू शकले नाहीत. मार्नस लॅब्यूशेन आणि ट्रॅविस हेड यांना वगळता कोणीही अर्धशतक करू शकले नाही. परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर त्यांनी इंग्लंडला ४६७ धावांचे भलेमोठे आव्हान दिले, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १९२ धावावरच गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला.
या सामना विजयासह स्मिथ हा दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार (Most Day/Night Test matches won as Captain) बनला आहे. त्याने आतापर्यंत ५ दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करताना संघाला हे पाचही सामने जिंकून दिले आहेत. स्मिथप्रमाणे रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांनीही हे पराक्रम केले आहेत. परंतु त्यांनी अनुक्रमे वनडे आणि टी२० सामन्यांमध्ये हे किर्तीमान केले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिगने त्याच्या नेतृत्त्वाखाली वनडेत १३६ दिवस-रात्र सामने खेळले होते, ज्यातील ८९ सामने संघाने जिंकले होते. तर ३७ सामन्यात संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. भारताचा माजी कर्णधार धोनीने टी२० स्वरुपाच ही किमया साधली होती. त्याने ३३ दिवस-रात्र स्वरुपातील टी२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्त्व करत १७ सामने जिंकले होते आणि १४ सामने गमावले होते.
सर्वाधिक दिवस-रात्र सामने जिंकणारे कर्णधार
स्टिव्ह स्मिथ (कसोटी) – ५ कसोटी, ५ विजय, ० पराभव*
रिकी पाँटिंग (वनडे) – १३६ वनडे, ८९ विजय, ३७ पराभव
एमएस धोनी (टी२०)- ३३ टी२०, १७ विजय, १४ पराभव
महत्त्वाच्या बातम्या-
यांचा थाटच निराळा! सुरेश रैनाच्या कारमधील ‘त्या’ फोटोनंतर भज्जी अन् जॉन्टीनेही दाखवला आपला रॉयल लूक…
दक्षिण आफ्रिका-भारत ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला प्रेक्षक लावणार का हजेरी? वाचा सविस्तर
ऍडलेड कसोटीतील पराभवासह ‘या’ नकोशा विक्रमात चौथ्या स्थानी पोहोचला इंग्लंडचा संघनायक जो रूट