22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरुवात होत आहे. यंदा ही मालिका ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथनं यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या एका दशकापासून भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. स्मिथनं याची भरपाई करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.
यावेळी 1991-92 नंतर प्रथमच बॉर्डर-गावस्कर मालिकेत पाच कसोटी सामने खेळले जातील. स्टीव्ह स्मिथनं ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना सांगितलं की, प्रत्येक संघाला एवढ्या मोठ्या मालिकेत स्वत:ला सिद्ध करावं लागतं. तो म्हणाला, “पाच सामन्यांच्या मालिकेत तुम्ही लपून राहू शकत नाही, जसं तुम्ही कदाचित दोन सामन्यांच्या मालिकेत करू शकता. जर एखाद्या खेळाडूनं तुमच्यावर वर्चस्व गाजवलं तर पुनरागमन करणं कठीण होऊ शकतं. ही अतिशय रोमांचक मालिका असेल.”
स्टीव्ह स्मिथसाठी या मालिकेला विशेष महत्त्व आहे, कारण गेल्या दहा वर्षांपासून ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. स्मिथ म्हणाला, “सध्याच्या घडीला आम्ही (भारत आणि ऑस्ट्रेलिया) कसोटी क्रिकेटमधील दोन सर्वोत्तम संघ आहोत. आम्ही गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळलो. आता आम्हाला घरच्या मैदानावर बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकायची आहे. दहा वर्ष झाली, या वर्षी आम्हाला ते करायचं आहे.”
ऑस्ट्रेलियानं शेवटची बॉर्डर-गावस्कर मालिका 2014-15 मध्ये 2-0 ने जिंकली होती. परंतु त्यानंतर कांगारुंनी सलग चार मालिका गमावल्या आहेत. यापैकी दोन पराभव घरच्या मैदानावर झाले. ऑस्ट्रेलियाचा 2018-19 मध्ये विराट कोहलीच्या संघाविरुद्ध आणि 2020-21 मध्ये अजिंक्य रहाणेच्या संघाविरुद्ध घरच्या मैदानावर पराभव झाला.
हेही वाचा –
चेंडू मानेला लागताच थेट हॉस्पिटलमध्ये दाखल, अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूसोबत भीषण अपघात
गौतम गंभीरनं निवडली त्याची सर्वकालीन वर्ल्ड इलेव्हन, संघात तीन पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश
बीसीसीआयची बल्ले-बल्ले! आयपीएलद्वारे इतक्या कोटींची कमाई, आकडा जाणून बसेल धक्का!