मुंबई । भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. विराट आज क्रिकेटच्या दुनियेतला एक मिसाल बनला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने फॉक्स स्पोर्टशी बोलताना विराट कोहलीमध्ये झालेले बदल पाहून भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
स्मिथ म्हणाला, “विराट कोहली क्रिकेटमध्ये स्वतःला सर्वोत्तम बनवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. त्यामुळेच विरोधी संघात त्याचा एक धाक निर्माण झाला आहे. शारीरिक दृष्टय़ा तो खूपच तंदुरुस्त आहे. त्यांवर खूप काम केले आहे. तो जगातला सर्वात फिट आणि मजबूत खेळाडू होण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.”
या मुलाखतीत स्टिव्ह स्मिथने विराट कोहलीची 2007 साली झालेल्या पहिल्या भेटीचे देखील आठवण सांगितली. ब्रिस्बेन क्रिकेट अकादमीत विराट कोहली आणि स्मिथची मुलाखत झाली होती. तो म्हणाला, “मी विराट कोहलीला खूप वर्षांपासून ओळखतो. ब्रिस्बेन अकॅडमीत मी गोलंदाजी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा विराट कोहलीची भेट झाली. मैदानाच्या बाहेर आणि मैदानात ही आमची पहिली भेट होती.”
“विराटने स्वतःला एक खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. तो नेहमीच भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी आपले योगदान कशा पद्धतीने देऊ शकतो, यावर जास्त प्रयत्न करतो. तो खूपच चांगला माणूस आहे. तो खेळातला सर्वात मोठा दूत आहे. दिवसें दिवस तो सर्वोत्तम खेळाडू होत चालला आहे,” असेही हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पुढे म्हणाला.