‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सीरिज’चा दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू आहे. या ऐतिहासिक ‘बॉक्सिंग डे’ सामन्यातील पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर १३१ धावांनी आघाडी घेतली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फारशी बरी झाली नाही. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात अवघ्या १०५ धावा करत ६ विकेट्स गमावल्या. दरम्यान आपल्या मोठ्या आकडी खेळीसाठी ओळखला जाणारा स्टिव्ह स्मिथ तर दोन आकडी धावाही करू शकला नाही.
सलामीवीर फलंदाज जो बर्न्स आणि मार्नस लॅब्यूशाने यांच्या विकेट गमावल्यानंतर स्मिथ संघाचा डाव सावरेल, या अपक्षेने कर्णधार टीम पेनने त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. परंतु ३० चेंडूत केवळ ८ धावा करत स्मिथ मैदानाबाहेर पडला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला त्रिफळाचीत केले. ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही तो शून्यावर झेलबाद झाला होता. फिरकीपटू आर अश्विनने चेतेश्वर पुजाराच्या हातून त्याला झेलबाद केले होते.
महत्त्वाचे म्हणजे, या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातही स्मिथने दोन्ही डावात प्रत्येकी १ धाव केली होती. जर स्मिथची भारतीय कसोटी संघाविरुद्धची फलंदाजी आकडेवारी पाहायची झाली तर, त्याने पहिल्या २० डावात केवळ २ वेळाच एक आकडी धावा केल्या आहेत. याउलट मात्र मागील ४ डावात तो संघर्ष करताना दिसला असून ४ वेळा त्याला एकेरी धावांवरच भारतीय गोलंदाजांनी रोखले आहे. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की, सध्या भारतीय गोलंदाज स्मिथला वरचढ ठरत आहेत.
Steve Smith vs India in Tests:
First 20 innings: 2 Single digit scores.
Next 4 innings: 4 Single digit scores.
— Broken Cricket (@BrokenCricket) December 28, 2020
स्मिथची कसोटी आकडेवारी
स्मिथच्या आतापर्यंतच्या कसोटी आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत ७४ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान ६२.३२च्या सरासरीने त्याने ७२२९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ द्विशतकांचा आणि २६ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने भारताविरुद्ध २४ डाव खेळताना ७ शतके आणि ३ अर्धशतकांसह १४३९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : ५० षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाने गमावल्या ६ विकेट्स; अजूनही २७ धावांनी पिछाडीवर
टीम इंडियाच्या अडचणीत भर! गोलंदाजी करताना उमेश यादव ‘असा’ झाला दुखापतग्रस्त, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ: अवघ्या काही इंचांनी हुकली रहाणेची धाव, पाहा कसा झाला रनआऊट