सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे संमिश्र दिवस सुरू आहेत. केवळ एका आठवड्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषक आपल्या नावे केला. त्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याने तडकाफडकी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता त्याच्या जागेवर कोणाला कर्णधारपद द्यायचे हा प्रश्न क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढे आहे. मात्र, निवड समितीने या जबाबदारीसाठी अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार स्टीव स्मिथ याचे नाव सुचवल्याचे सांगितले, जात आहे.
पेनने दिला राजीनामा
सन २०१८ मध्ये बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर तत्कालीन कर्णधार स्टीव स्मिथ याच्या जागेवर यष्टीरक्षक फलंदाज टीम पेनची वर्णी लागली होती. मात्र, २०१७ मधील एक गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर पेनने दोन दिवसांपूर्वी आपण कसोटी संघाचे नेतृत्व सोडत असल्याची घोषणा केली. प्रतिष्ठेची ऍशेस मालिका अगदी तोंडावर आली असल्याने नवा कर्णधार म्हणून कोणाला जबाबदारी देण्यात येते हे पाहण्यासाठी क्रिकेट जगत उत्सुक आहे.
स्मिथ पुन्हा होऊ शकतो कर्णधार
ऑस्ट्रेलियातील माध्यमांचा वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची निवडसमिती माजी कर्णधार स्टीव स्मिथ याला पुन्हा कर्णधार बनवण्यास इच्छुक असून, त्यांनी त्यासंबंधीचा पत्रव्यवहार देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी केला आहे. संघाचा उपकर्णधार व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत असून, अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, ऍशेससारख्या अतिमहत्त्वाच्या मालिकेत अनुभवहीन कर्णधार खेळण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया धजावत नाही.
बॉल टेम्परिंग प्रकरणात झाली होती कारवाई
सन २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना सेंचुरियन कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून बेनक्रॉफ्ट दोषी आढळले होते. त्यानंतर या तिघांवर ही कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार, स्मिथला दोन वर्ष तर वॉर्नरला आजीवन कर्णधारपद भूषवण्यास मनाई करण्यात आली होती. स्मिथच्या कारवाईचा कालावधी संपल्यामुळे तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनू शकतो.