आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने कारकिर्दीतील सर्वोत्तम गुण मिळवून सार्वकालीन कसोटी क्रमवारीत (ICC Best-Ever Test Championship Rating) दुसरे स्थान मिळवले आहे.या क्रमवारीत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानी आहेत.
स्मिथ सध्या ९४७ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. ब्रॅडमन यांचे ९६१ हे सर्वोत्तम गुण होते. त्यामुळे स्मिथला ब्रॅडमन यांच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी निर्माण झाली आहे.
१० फेब्रुवारी १९४८ साली भारताविरुद्ध खेळताना ब्रॅडमन यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम (ICC Best-Ever Test Championship Rating) अर्थात ९६१ गुण मिळवले होते. तेव्हा आयसीसी क्रमवारी सुरु झाली नव्हती. आयसीसी क्रमवारीची सुरुवात १९८० या वर्षी सुरु झाली. त्यामुळे तेव्हा ब्रॅडमन यांच्या ह्या कामगिरीचा कुणाला नक्की अंदाज आला नव्हता.
परंतु नंतरच्या काळात ह्या धावांची आणि सामन्यांची सांगड घालून ती क्रमवारी काढण्यात आली. गेल्या १०वर्षात अनेक खेळाडू या विक्रमपर्यंत पोहचले. त्यात रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा आणि एबी डिव्हिलिअर्स यांचा समावेश आहे. परंतु कुणालाही हा विक्रम मोडता आला नाही.
चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी सार्वकालीन कसोटी क्रमवारीत(ICC Best-Ever Test Championship Rating) स्मिथने लेन हटन यांची बरोबरी केली होती. त्यांचे ९४५ हे क्रमवारीतील सर्वोत्तम गुण होते. याबरोबरच स्मिथने पीटर मे, रिकी पॉन्टिंग आणि जॅक हॉब्स यांनादेखील मागे टाकले होती.
परंतु स्मिथने चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ७६ तर दुसऱ्या डावात नाबाद १०२ धावा केल्यामुळे त्याच्या क्रमवारीतील गुणांच्या संख्येत दोनने भर पडली. त्यामुळे तो आता दुसऱ्या स्थानी आला आहे.
स्मिथने आजपर्यंत ६० कसोटीत ६३.५५ च्या सरासरीने५९७४ धावा केल्या आहेत. यात त्याची २३ शतके तर २२ अर्धशतके केली आहेत. तसेच डॉन ब्रॅडमन यांनी ५२ कसोटीत ९९.९४ सरासरीने ६९९६ धावा केल्या होत्या. त्यांनी २९ शतके आणि १३ अर्धशतके केली आहेत.
सार्वकालीन कसोटी क्रमवारी (ICC Best-Ever Test Championship Rating)
९६१- डॉन ब्रॅडमन-१९४८
९४७- स्टीव्ह स्मिथ-२०१७
९४५-लेन हटन १९५४
९४२-जॅक हॉब्स १९१२
९४२-रिकी पॉन्टिंग २००६