यजमान इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला गुरूवारपासून (८ जुलै) कार्डिफ येथे सुरुवात झाली. अनुभवाने अत्यंत कमी असलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा ९ गड्यांनी पराभव केला. युवा वेगवान गोलंदाज असलेल्या साकीब मेहमूदने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. या विजयासह प्रथमच वनडे सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या अष्टपैलू बेन स्टोक्स याने भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी याचा एक विक्रम मागे टाकला.
अनुभवहीन खेळाडूंसह उतरला इंग्लंडचा संघ
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड संघातील तीन खेळाडू व चार कर्मचारी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे अगदी कमी कालावधीत इंग्लंडने आपला संपूर्ण संघ बदलत नवा संघ जाहीर केला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना यामध्ये स्थान देण्यात आले. दुखापतीमुळे काही काळ विश्रांती करत असलेल्या अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या हाती संघाचे नेतृत्व देण्यात आले. पहिल्याच सामन्यात तब्बल पाच खेळाडूनी इंग्लंडसाठी पदार्पण केले.
इंग्लंडचा सोपा विजय
या सामन्यात पाकिस्तान संघाचे पारडे जड वाटत होते. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा डाव अवघ्या १४१ धावांवर गुंडाळला. वेगवान गोलंदाज साकीब मेहमूद याने चार बळी आपल्या नावे केले. प्रत्युत्तरात, डेव्हिड मलान व झॅक क्राऊली यांच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने हे आव्हान २१ षटकात एक गडी गमावत पूर्ण केले. मेहमूद हा सामनावीर ठरला.
स्टोक्सने टाकले धोनीला मागे
कर्णधार म्हणून पहिला सामना खेळत असलेल्या बेन स्टोक याने या विजयासह भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याला सर्वात युवा संघासह विजय मिळविण्याच्या बाबतीत मागे सोडले. धोनीने २०१६ मध्ये झिम्बाब्वे दौर्यावर अनुभवहीन खेळाडूंसोबत विजय मिळवला होता. त्यावेळी धोनीने २८५ वनडे तर, उर्वरित संपूर्ण संघाने केवळ ७३ वनडे सामने खेळले होते.
धोनी आणि संघातील उर्वरित खेळाडूंच्या अनुभवाचे गुणोत्तर ३.७६७ होते. पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास, स्टोक्सने एकूण ९८ वनडे सामने खेळले आहेत, तर उर्वरित इंग्लंड संघाने एकूण २६ सामने खेळले आहेत. अशाप्रकारे, स्टोक्स आणि उर्वरित संघाच्या अनुभवाचे गुणोत्तर ३.७६९ होते.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका दौऱ्यात युजवेंद्र चहलची अग्निपरिक्षा; पाहा या दौऱ्याबद्दल काय म्हणाला भारतीय फिरकीपटू
‘जर धोनी पुढील आयपीएल हंगाम खेळणार नसेल, तर मीही खेळणार नाही’, सुरेश रैनाचे चकीत करणारे भाष्य