आयपीएलमध्ये २०११ सगळ्यात बाप टीम म्हटलं, तर धोनी अण्णाची सीएसके. पहिलं तर ते डिफेंडींग चॅम्पियन आणि दुसरा म्हणजे सिझनला ते तुफान सुटलेले. सलग दुसरी ट्रॉफी मारायची एवढंच त्यांच्या डोक्यात. अशात त्यांची मॅच आली डिंपल गर्ल प्रिती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्ध. पंजाबला जिंकायला करायच्या होत्या १८९. आता त्यावेळी सीएसके एखाद्या टीमला १५० करू देत नव्हती तिथे हा स्कोर म्हणजे पंजाबसाठी हिमालयच. सारे टॉपचे बॅटर गळाले आणि एक नवा भिडू सीएसकेला भिडला. नाव त्याचं पॉल वॉल्थटी.
साडेपाच फुटाच्या पॉलन बॉल असे काही मारले की ६३ बॉलमध्येच १२० रन्स करून संघाला मॅच जिंकवली. आयपीएलने चार वर्षात असे स्टार डझनाने दिले होते, पण पॉल थोडा वेगळा निघाला. पुढच्या मॅचला त्याने आणखीच कहर केला. ७५ रन्सही मारल्या आणि चार विकेटही घेतल्या. एवढ्यावर तो थांबला नाही आणि आणखी एक ४६ रनांची तुफानी इनिंग त्यान खेळली. अजूनही आठवतय की, कोणत्यातरी एका हिंदी न्यूज चॅनलन पॉलला डायरेक्ट दशावतारात दाखवलं होतं, पण काय माहित याच कौतुकानं त्याला नजर लागली.
एवढं चांगलं खेळत असताना अचानक त्याचा फॉर्म गेला. मनगटाची दुखापत झाली आणि गडी त्यातून लवकर काही सावरलाच नाही. त्याच आयपीएल खेळण सुटलं. ती मनगटाची दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला धड बॅट उचलता येत नव्हती. इथच त्याच्या आयपीएल करियरला फुल स्टॉप लागला.
हेही पाहा- चेंडू लागून दृष्टी गेली मात्र तरीही पॉल वॉल्थटीने कमबॅक केलाच
पॉल वॉल्थटी आयपीएलपर्यंत पोहोचला कसा याची कहाणी पण इंटरेस्टिंग आहे बरं का. पॉलचं घरदार आंध्र प्रदेशचं, पण आपल्या मुंबईनं देशातल्या साऱ्यांना पोटात घेतलंय तसं पॉलच्या कुटुंबालाही घेतलं. पॉल बोरवलीत वाढला. आपल्याच दिलीप वेंगसरकरांच्या ॲकॅडमीत तो क्रिकेट शिकला. खरं तर आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनी यासाठी शब्द टाकलेला. मुंबईच्या एज ग्रुप क्रिकेटमध्ये त्याचं नाव होतं होतं. २००२ मध्ये अंडर नाईन्टीन वर्ल्डकपला इंडियाची टीम पाठवायची होती. त्या टीमचे सल्लागार होते वेंगसरकर. आपला लाडका शिष्य परफार्मन्स करतोय आणि वयात पण आहे मग त्याला का डावलायच म्हणून, त्यांनी पॉलच नाव सुचवलं, आणि पॉल वर्ल्डकप वारीला गेला. त्यावेळी संघात होती पार्थिव पटेल, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी सारखी टॅलेंटेड पोरं, जी पुढे जाऊन टीम इंडियात खेळली.
इंडियान वर्ल्डकप मिशन सुरू केलं. इंडिया आणि बांगलादेशची मॅच खेळली जात होती. त्याच मॅचमध्ये एक अशी घटना घडली जिच्यामुळे पॉलच्या क्रिकेट करियरला चांगलाच ब्रेक लागला. एक बाउन्सर बॅटिंग करत असलेल्या पॉलच्या डोळ्यांवर येऊन लागला. तोही हेल्मेटच्या आत येतं. क्षणात डोळ्यासमोर अंधारी आली. ट्रीटमेंट घेतल्यावर कळले की त्याची नजर कमी झाली. हा मोठा धक्का होता. त्याला काहीही करुन क्रिकेट खेळायचं म्हणून डोळ्यावर एक दोन नव्हे तर चार-चार लेझर ऑपरेशन करून घेतली. नव्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली अगदी बेसिकपासून.
सन २००६ला मुंबईच्या वनडे टीममध्ये त्याला जागा मिळाली, पण पदरी पुन्हा अपयशच. अशीच दोन-तीन वर्षे गेली आणि २००९ आयपीएलआधी राजस्थान रॉयल्सन त्याला करारबद्ध केले. त्या सिझनला राजस्थानसाठी त्याला दोन मॅच खेळायला मिळाल्या. इथून त्यान मुंबईच्या टी२० टीम मध्ये जागा मिळवली आणि धडाका करत २०११ आयपीएल सिझनला डायरेक्ट किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये एंट्री केली. त्यानंतर काय घडलं हे तर तुम्हाला सांगितलंच आहे.
आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर त्याला सावरायला बराच वेळ गेला. त्याला एअर इंडियान नोकरी देऊ केली, पण पॉल मेनस्ट्रीम क्रिकेटमधून बाहेर पडला. तो शेवटचा टीव्हीवर खेळताना दिसला २०१९ च्या मुंबई टी२० लीगमध्ये… तेही फक्त पन्नास हजाराच्या किमतीत आणि डेव्हलपमेंट प्लेयर म्हणून. आज ब्रेबॉर्नवर पॉल कोच म्हणून काम करतोय. आपलं इंडियासाठी खेळायचं स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी, आपल्या एखाद्या शिष्याचं ते स्वप्न पूर्ण व्हाव म्हणून.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा पहिल्यांदाच IPL खेळाडूला चढावी लागलेली पोलीस स्टेशनची पायरी, आरसीबीशी होतं कनेक्शन
लंबूजी! क्रिकेटच्या मैदानावर ‘या’ खेळाडूंच्या उंचीचीच रंगते चर्चा, ‘टॉप’ला फक्त पाकिस्तानी क्रिकेटर