क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू होऊन गेले, ज्यांनी अत्यंत कमी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावले. काहीवेळा आपल्या अप्रतिम कामगिरीने तर कधी, एखाद्या वादग्रस्त घटनेने हे खेळाडू जगप्रसिद्ध झाले. यामध्ये एक खेळाडू असा देखील होता जो, आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर देशाचा कर्णधार झाला, नंतर मॅच फिक्सिंगसारख्या क्रिकेटला कलंकित करणार्या घटनेत सहभागी झाला आणि एका विमान अपघातात वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी हे जग सोडून देखील गेला. तुम्ही ओळखलेच असेल? होय, हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए.
वेसल जोहान्स क्रोनिए असे त्याचे पूर्ण आणि खरे नाव. २५ सप्टेंबर १९६९ रोजी दक्षिण आफ्रिकेच्या ब्लोमफोंटेन शहरात त्याचा जन्म झाला. हॅन्सीमध्ये जन्मजात एका खेळाडूची कौशल्य होती. तो शिकत असलेल्या ग्रे कॉलेजच्या क्रिकेट व रग्बी संघाचा कर्णधार होता. त्याचे वडील इवी व भाऊ फ्रान्स हे ऑरेंज फ्रि राज्य संघाकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत. वडील व भावाप्रमाणे त्यानेदेखील ऑरेंज फ्रि संघाचे प्रतिनिधित्व व नंतर नेतृत्व केले. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तो प्रथमश्रेणी संघाचा कर्णधार झाला होता.
१९९१ मध्ये क्रोनिएने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हाच, तो एक दिवस द. आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवेल, असा विश्वास सर्वांना वाटत होता. १९९२ मध्ये ज्यावेळी द. आफ्रिका क्रिकेट मंडळाचे निलंबन संपले त्यावेळच्या संघात क्रोनिएचा समावेश करण्यात आला होता. आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर तो द. आफ्रिकेचा प्रमुख खेळाडू बनला. द. आफ्रिकेत तो चांगलाच प्रसिद्ध झाला होता. केपलर वेसल्स निवृत्त झाल्यानंतर, द. आफ्रिकेचा कर्णधारपदाची माळ क्रोनिएच्या गळ्यात पडली. तिथून पुढे, आपल्या कल्पक कप्तानीच्या जोरावर तो द. आफ्रिका क्रिकेटचे प्रतीक बनला. द. आफ्रिका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अली बाकर कायम त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करत.
क्रोनिए एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आणि हुशार कर्णधार होता. मॅच फिक्सिंग प्रकरणाचा कलंक त्याच्यावर लागला नसता तर तो, कदाचित जगातील सर्वोत्तम कर्णधार बनू शकला असता.
१९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यावेळी तो नैराश्यग्रस्त होता. याच नैराश्यातून त्याने मॅच फिक्सिंग केली असा दावा त्याच्या भावाने केला होता. ज्यावेळी क्रोनिएवर पहिल्यांदा मॅच फिक्सिंगचे आरोप लावले गेले, तेव्हा त्याने ते धुडकावून लावले. मात्र, २००० मध्ये किंग कमिशनसमोर कबुली देत म्हटले की, “भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत सामना गमवण्यासाठी व भारताचा विजय निश्चित करण्यासाठी मी ३० हजार डॉलर्स घेतले होते.”
यानंतर, फिक्सिंगचे असे काही भूत बाहेर आले की, संपूर्ण क्रीडाविश्व अचंबित झाले. अनेक मोठे खेळाडू यात दोषी सापडले. हर्शेल गिब्स, निकी बोयेसह बऱ्याच द. आफ्रिकेच्या खेळाडूंची नावे समोर आली. मात्र, केवळ क्रोनिएवर आजीवन बंदी लादण्यात आली.
पाहता पाहता, द. आफ्रिकेचा हा ‘गोल्डन बॉय’ यशाच्या शिखरावरून एकदम खाली फेकला गेला. द. आफ्रिकन जनतेचा त्याच्यावर रोष वाढला. आपल्या यशाच्या काळात तो नेल्सन मंडेला यांच्यानंतर द. आफ्रिकेतील सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्ती होता.
कर्णधार म्हणून क्रोनिएची कामगिरी अतुलनीय होती. त्याने खेळलेल्या ६८ कसोटी सामन्यांपैकी ५३ सामन्यात कर्णधारपद भूषवले होते. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात द. आफ्रिकेने २७ कसोटी सामने जिंकले, तर ११ कसोटी सामन्यात पराभव पत्करला. क्रोनिएने १३८ एकदिवसीय सामन्यांत द. आफ्रिकेचे नेतृत्व केले आणि त्यातील ९८ सामने द. आफ्रिकेने जिंकले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सर्वाधिक त्रास देणारा गोलंदाजही क्रोनिएच होता. सचिनने एका मुलाखतीत सांगितले की, “खरे सांगायचे तर हॅन्सीने मला इतर कोणत्याही गोलंदाजांपेक्षा अधिक त्रास दिला आहे. आम्ही जेव्हा जेव्हा द. आफ्रिकेविरूद्व खेळत असत तेव्हा हॅन्सी नेहमी मला ऍलन डोनाल्ड किंवा शॉन पोलॉकपेक्षा वरचढ वाटत. मला त्याचे चेंडू समजत नसत.”
क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर त्याने व्यवसायात हात आजमवायला सुरुवात केली होती. त्यानिमित्ताने तो सतत दौऱ्यावर असे. १ जून २००२ ला जोहान्सबर्गवरून व्यावसायिक कामानिमित्त जॉर्ज या ठिकाणी जाण्यासाठी तो हॉकर सिडले एचएस ७४८ टर्बोप्रोप या खाजगी विमानात बसला. त्यावेळी विमानात त्याच्या व्यतिरिक्त फक्त दोन वैमानिक होते. जॉर्ज विमानतळाच्या आसपास गेल्यानंतर, धुक्यामुळे त्यांचे विमान भरकटले व ते ओटेनिका पर्वतावर कोसळले. त्याच अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर, हा अपघात नसून खून असल्याचा दावा अनेकांनी केला. मात्र, यातून काहीही तथ्य बाहेर आले नाही.
क्रोनिएच्या मृत्यूची कहाणी देखील रंजक आहे. त्याचा भाऊ फ्रान्सने एका मुलाखतीत सांगितले होते, “बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजे १ जून १९९२ ला तो मला म्हणालेला, आम्ही क्रिकेटर खेळण्यासाठी कायम विमानाने प्रवास करत असतो. असंच एक दिवस एखाद्या विमान अपघातात माझा मृत्यू होईल आणि मी स्वर्गात जाईल.”
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कायम प्रसिद्धीझोतात राहिलेल्या हॅन्सीचा मृत्यूदेखील एक रहस्य बनून राहिला. आपल्यासोबत त्याने अनेक गुपिते नेली. एक कर्णधार म्हणून तो अनेकांना कायम प्रेरणा देतो.
वाचा- या खेळाडूने फक्त क्रिकेटचं नाही, तर ड्रग्जचं मैदानही गाजवलंय