इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघाला विजय मिळवून देण्यात मध्य प्रदेशच्या आवेश खानने मोलाची भूमिका बजावली आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. लवकरच तो भारतीय संघासाठी देखील खेळताना दिसून येऊ शकतो. विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि इंग्लंड दौऱ्यासाठी आवेशला राखीव खेळाडू म्हणून स्थान मिलाले आहे. परंतु आवेशने इथपर्यंत पोहोचण्यासाठी काही कमी संघर्ष केला नाहीये. चला तर जाणून घेऊया.
आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ८ सामने खेळले. यात त्याला १४ गडी बाद करण्यात यश आले होते. यात त्याने एमएस धोनीला क्लीन बोल्ड केले होते. मुख्य बाब म्हणजे या संघात ईशांत शर्मा, उमेश यादव आणि एन्रिच नॉर्खिया यांसारखे दिग्गज आणि अनुभवी गोलंदाज असताना देखील रिषभ पंतने आवेश खानला संधी दिली होती. तसेच आवेशने या संधीचे सोने देखील केले होते.
आवेशने हे यश मिळवल्यानंतर म्हटले की,” ज्या लोकांना वाटत होते की मी आयुष्यात काहीच करू शकत नाही. तेच आता मला शुभेच्छा देत आहेत.”
आवेश मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. त्याच्या वडिलांची इंदोरमध्ये छोटी पान टपरी आहे. आवेश लहान असताना त्याच्या वडिलांसोबत कधीकधी पान टपरी चालवत असे. परंतु तो अवघ्या १४ वर्षांचा असताना रस्ते बांधकामाच्या वेळी त्यांची टपरी तोडण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले होते. तेव्हा त्याने ठरवले होते की, हातावर हात ठेऊन बसल्याने काहीही होणार नाही. त्यावेळी त्याने आपले नशीब क्रिकेटमध्ये आजमावून पाहिले होते. त्यानंतर त्याची भारतीय अंडर-१९ संघात निवड झाली होती.
आवेश हा वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीमध्ये खूप गती होती. परंतु त्याला गोलंदाजीमध्ये मिश्रण करता येत नव्हते. त्यानंतर त्याने स्लोवर चेंडू टाकण्याचा कसून सराव सुरू केला होता. यात त्याला वेंकटेश अय्यर आणि रजत पाटीदार यांनी खूप मदत केली होती. हा चेंडू टाकण्याची कला अवगत झाल्यानंतर त्याच्या गोलंदाजीमध्ये भरपूर सुधारणा झाली. त्याने या आयपीएल हंगामात स्लोवर चेंडू टाकून भल्याभल्या फलंदाजांना माघारी धाडले होते.
आवेश खान आणि रिषभ पंत यांची मैत्री खूप चांगली आहे. कारण हे दोघेही २०१६ मध्ये झालेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत एकत्र खेळले होते. याचाच फायदा त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेतही झाला. रिषभ पंत त्याला यष्टीच्यामागून कुठे गोलंदाजी केली तर फलंदाज बाद होईल? यासाठी मार्गदर्शन करत असे.
तसेच जेव्हा आवेशने धोनीला बाद केले होते; तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यावेळी त्याने म्हटले होते की, “मला लाँग ऑनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक हवा होता. परंतु रिषभने तो क्षेत्ररक्षक मिड ऑनच्या दिशेने ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याने मला सांगितलं की, धोनीला शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न कर आणि मी तसेच केले त्यांनतर धोनीच्या बॅटचा कडा घेत चेंडू यष्टीला जाऊन लागला होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीला लहानाची मोठी करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचे कोरोनामुळे निधन
“आता परदेशी खेळपट्ट्यांवरही विरोधकांना आमच्यापासून सावध राहावे लागेल”, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य
‘हा’ १९ वर्षीय क्रिकेटपटू बनलाय राजस्थान रॉयल्सचा ‘धोनी’; कोहलीच्या सल्ल्याने दाखवलाय मार्ग