नशीब… असे म्हटले जाते की, कुणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. पण फक्त चांगल्या नशीबासह सर्वकाही मिळत नाही, त्यासाठी अथक परिश्रम आणि त्याग करावा लागतो. त्यानंतर कुठे कष्टाचे फळ पदरात पडते. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आपले साम्राज्य स्थापित केले आहे. यावेळी त्यांचे वडील हिमांशू पंड्या यांचे पाठबळ त्यांच्या मागे होते. परंतु त्यांच्या आयुष्यातील खरा नायक आता जग सोडून खूप दूर निघून गेला आहे.
पंड्या बंधूंना शनिवारी (१६ जानेवारी) पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील हिमांशू पंड्या यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटका आल्याने उपाराचासाठी रुग्णालयात नेतेवेळी निधन झाले आहे. त्यामुळे या दोन्ही क्रिकेटपटूंवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हिमांशू पंड्या हे हार्दिक आणि कृणाल लहान असताना गुजरात राज्यातील सूरत शहरात वित्तपुरवठ्याचा (फायनन्स) व्यापार करत असायचे. मात्र काही कारणास्तव १९९८ मध्ये त्यांना आपला व्यापार बंद करावा लागला. त्यानंतर आपल्या कुंटुंबासह ते आपले मुळगाव वडोदरा येथे स्थायी झाले. त्यावेळी हार्दिक आणि कृणाल जवळपास ६-७ वर्षांचे होते.
हिमांशू पंड्या यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळे कामातून वेळ काढून ते आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट सामने पाहायला घेऊन जात असत. इथूनच हार्दिक आणि कृणाल यांना क्रिकेटपटू बनण्याची प्रेरणा मिळाली. लहान असले तरी आपल्या मुलांमध्ये एक चांगला क्रिकेटपटू होण्याइतपत क्षमता असल्याचे पाहून हिमांशू यांनीही त्यांना भविष्यात क्रिकेट क्षेत्रात पाठवण्याचे मनाशी पक्के केले.
घरची आर्थिक परिस्थिती मजबूत नसतानाही त्यांनी बडोदा येथील प्रसिद्ध किरण मोरे अकादमीमध्ये दोघांनाही क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. तिथे दोन वेळचे अन्न मिळण्याइतके पैसे त्यांच्याकडे नसत. कधी-कधी तर सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात पाच रुपयांच्या मॅगीवर पंड्या बंधूंनी आपले पोट भागवले आहे. पैश्यांच्या तंगीमुळे त्यांना सराव करत असताना आपल्या मित्रांकडे त्यांचे क्रिकेट किट मागावे लागत असे. मात्र हिमांशू यांच्या मानसिक प्रेरणेमुळे त्यांना सतत हिम्मत मिळत असे.
पुढे हार्दिक आणि कृणालने आपल्या मेहनतीने स्थानिक क्रिकेट स्पर्धांपासून ते जगप्रसिद्ध आयपीएलपर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या आयपीएलमधील दमदार प्रदर्शनानेच त्यांच्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची दारे खुली केली. सोबतच त्यांच्या नशीबाची दारेही नेहमीसाठी खुली झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
दु:खद! हार्दिक, कृणाल पंड्याच्या वडीलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
पंड्या बंधूंच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने विराट झाला भावूक, ट्विट करत व्यक्त केला शोक