चिन्नप्पापट्टी नावाचे तमिळनाडूतील सालेम जिल्ह्यात एक लहान गाव आहे. चेन्नईपासून अंदाजे ३४० किलोमीटर दूर. याच गावातील एका २९ वर्षीय मुलाने २०२० आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत, आपला पहिला बळी म्हणून, सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीला बाद केले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रिषभ पंत, शिमरन हेटमायर, मार्कस स्टोइनिस या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नावाजलेल्या फटकेबाजांविरूद्ध इच्छेनुसार यॉर्कर टाकून त्यांना धावा काढू दिल्या नाहीत. चिन्नप्पापट्टी येथे टेनिस बॉल क्रिकेट खेळून युएईमध्ये भल्याभल्या फलंदाजांना नामोहरम करणारा, हा गोलंदाज आहे टी नटराजन.
आज (४ एप्रिल) तोच नटराजन ३१ वर्षांचा झाला आहे. २०२०-२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्याद्वारे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली होती. त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली होती. त्याला त्याच्या कसोटी पदार्पणाची कॅप भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्याकडून मिळाली. याच दौऱ्यावर त्याचे वनडे आणि टी२० पदार्पणही झाले.
चिन्नप्पापट्टी भारतातील, इतर खेडेगावांप्रमाणेच एक खेडेगाव. भारतातील इतर मुलांप्रमाणे या गावातील मुले देखील टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. चांगल्या दर्जाच्या क्रिकेटसाठीच्या कोणत्याही सुविधा गावात उपलब्ध नाहीत. नटराजन देखील आवड म्हणून क्रिकेट खेळत. नटराजन यांचे वडील एका साडीच्या कारखान्यात कामाला होते तर आई मोलमजुरीचे काम करत. अभ्यासात बऱ्यापैकी असलेला नटराजन क्रिकेटमध्ये अत्यंत निपून होता. वेगवान गोलंदाजी करणे त्याला आवडत. त्याच्या यॉर्करला तोंड देणे सर्वांना अवघड जात. संपूर्ण तामिळनाडूमध्ये त्याचे टेनिस क्रिकेटमध्ये खूप नाव झाले होते. बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज, मुस्तफिजुर रहमान प्रमाणे, यॉर्कर टाकण्याच्या क्षमतेमुळे, त्याला अनेक जण “तमिळनाडूचा मुस्तफिजुर” असे म्हणत.
तमिळनाडू टेनिस बॉल क्रिकेटचा दिग्गज असलेला नटराजन विसाव्या वर्षापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. २०१७ मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीगच्या डिंडीगुल ड्रॅगन्स संघात तो निवडला गेला. त्या स्पर्धेतील एका सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतर, अभिनव मुकुंद व वॉशिंग्टन सुंदर या फलंदाजांविरुद्ध सहा यॉर्कर चेंडू टाकत त्याने लक्ष वेधून घेतले. त्या स्पर्धेत, सहा सामने खेळत त्याने, ९ बळी मिळवले. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट ५.४ इतका कमी होता.
टीएनपीएल मधील चमकदार कामगिरीच्या जोरावर, त्याला २०१७ आयपीएलच्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने तीन करोड इतकी रक्कम मोजत आपल्या संघात सामील केले. पंजाब संघात निवड झाल्यावर, त्याने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की,
“आयपीएलमध्ये निवड झाल्याचा आनंद आहेच तसेच इतकी मोठी रक्कम मिळाल्याचेही आश्चर्य वाटत आहे. या पैशातून सर्वप्रथम मी मोठे घर बांधणार आहे. कारण, माझ्या आईवडिलांनी आतापर्यंत खूप कष्ट केले आहेत. आता मला त्यांना सुखात ठेवायचे आहे.”
साल २०१७ आयपीएलमध्ये त्याला, सहा सामने खेळायला मिळाले. मात्र, तो ९ च्या महागड्या इकॉनोमी रेटने अवघे दोन बळी मिळवू शकला. आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे, लोक त्याचे नाव विसरू लागले. २०१८ च्या टीएनपीएल हंगामात त्याने लायका कोवई किंग्सचे प्रतिनिधित्व केले. गेल्या वर्षीपेक्षा, त्याने यावर्षी वरचढ कामगिरी केली. आठ सामन्यात १२ बळी घेताना त्याने, इकॉनोमी रेट ५.२ असा राखला.
साल २०१८ मध्ये जेव्हा, आयपीएलचा मोठा लिलाव करण्यात आला तेव्हा मुथय्या मुरलीधरनने त्याचा समावेश सनरायझर्स हैदराबाद संघात केला. २०१८ व २०१९ या दोन्ही हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी ठरला. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत, १३ सामन्यात ११ बळी घेत, त्याने तमिळनाडू संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेतही त्याचा इकॉनॉमी रेट ५.८ असा राहिला होता जो फक्त, तमिळनाडूच्याच साई किशोरपेक्षा जास्त होता.
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, अखेरीस २०२० साली त्याला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपला पहिला आयपीएल बळी म्हणून त्याने, आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. एवढेच नाही तर या आयपीएल हंगामात त्याने मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स अशा नावाजलेल्या गोलंदाजांपेक्षाही अधिक यॉर्कर चेंडू टाकले. त्याला आयपीएलमध्ये नवा यॉर्कर किंग अशी उपाधीही मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| हैदराबाद वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल हैदराबाद वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
एकदाच खेळले पण टिच्चून खेळले! आयपीएल इतिहासातील केवळ एक सामना गाजवणारे भारतीय खेळाडू