भारताचे माजी खेळाडू व विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री हे खेळाडू आणि प्रशिक्षक यापेक्षा समालोचक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. २००७ टी२० विश्वचषक असो वा २०११ क्रिकेट विश्वचषक असो, या ऐतिहासिक क्षणांचे समालोचन रवी शास्त्री यांनी केले होते. त्यांचे आवेशपूर्ण शब्द आजही प्रत्येक क्रिकेट चाहत्याला जसेच्या तसे पाठ आहेत. भारतासाठी ज्याप्रकारे रवी शास्त्री अव्वल समालोचक आहे त्याचप्रकारे पाकिस्तानचा प्रसिद्ध समालोचक म्हणजे रमीझ राजा. त्या रमीझ राजाचा आज वाढदिवस.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेला रमीझ आपल्या परिवारातील पहिला क्रिकेटर नव्हता. पाकिस्तानचे दिग्गज वसीम राजा हे त्याचे मोठे बंधू होते. रमीझचे वडील राजा सलीम हेदेखील मुलतानसाठी क्रिकेट खेळत. रमीझच्या पदार्पणावेळी वसीम राजा हे देखील संघात होते. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी तिसरी भावांची जोडी होती.
रमीझने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी अ दर्जाचे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. १९८४ साली इंग्लंड विरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले. पहिल्या कसोटीत दोन डावात मिळून तो अवघी एक धाव बनवू शकला. पुढच्या वर्षी, न्यूझीलंडविरुद्ध एकदिवस पदार्पण करताना मात्र त्याने, ७६ चेंडूत ७५ धावांची मॅचविनिंग खेळी केली. न्यूझीलंड विरुद्ध शानदार पदार्पण केल्यानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखले. पहिल्या एका वर्षातच सात वेळा चाळीसहून अधिक धावांच्या खेळ्या त्याने केल्या.
रमीझ आपल्या कारकीर्दीत सामान्य खेळाडू म्हणून गणला गेला. मात्र, खऱ्या अर्थाने तो ‘विश्वचषकाचा खेळाडू’ होता. विश्वचषक खेळताना वेगळाच रमीझ राजा प्रेक्षकांना पाहायला मिळायचा. त्याच्या कारकिर्दीतील धावांची सरासरी ३२.०९ इतकी साधारण असली तरी, विश्वचषकात मात्र, १६ सामन्यात त्याने ५३.८४ च्या अफलातून सरासरीने ७०० धावा काढल्या होत्या.
१९८७ च्या विश्वचषकात पाकिस्तानला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन जाण्यात रमीझचा सिंहाचा वाटा होता. १९८७ ला अपूर्ण राहिलेले विजयाचे स्वप्न पाकिस्तानने १९९२ ला पूर्ण केले. त्या संघाचाही रमीझ एक प्रमुख सदस्य होता. १९९२ च्या विश्वचषकात रमीझने ५८.१६ च्या सरासरीने दोन शतकांसह ३४९ धावा फटकावल्या होत्या.
विश्वचषकात ३ शतके झळकावणारा तो विवियन रिचर्ड्स यांच्यानंतर अवघा दुसरा फलंदाज होता. रिचर्ड्स यांनी चार विश्वचषकातील १९ सामन्यात अशी कामगिरी केली होती ती तर रमीझला तीन शतके पूर्ण करण्यासाठी, दोन विश्वचषक व १३ सामने लागले. विश्वचषकातील, अंतिम चेंडूवर झेल घेणारा तो पहिला खेळाडू होता. त्यानंतर, २००३ मध्ये डॅरेन लेहमन याने विश्वचषकाच्या अंतिम चेंडूवर झेल घेतला होता.
क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे बाद दिला गेलेला तो क्रिकेट इतिहासातील पहिला क्रिकेटपटू आहे. १९८७ मध्ये इंग्लंडविरुद्ध ९८ धावांवर खेळत असताना, त्याने चेंडू फटकावून दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरी धाव घेताना त्याने क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू बॅटने अडवला. त्यामुळे पंचांनी त्याला बाद ठरवले.
१९९२-१९९७ या काळात त्याने प्रभारी कर्णधार म्हणून पाकिस्तानचे नेतृत्व केले. यात २२ वनडे व ५ कसोटींचा समावेश आहे. १९९७ ला भारताविरुद्ध एकदिवसीय सामना खेळून त्याने क्रिकेटला अलविदा केला. निवृत्त होण्यापूर्वी, रमीझच्या नावे, ५७ कसोटीत २,८३३ तर १९८ वनडेमध्ये ५,८४१ धावा जमा होत्या. कसोटी व वनडेमध्ये त्याची सरासरी अनुक्रमे ३१.८३ व ३२.०९ इतकी मामुली राहिली. रमीझने आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अवघे एक षटक गोलंदाजी केली आहे.
उच्चशिक्षित असलेल्या रमीझने निवृत्तीनंतर, व्यवस्थापन पदवी घेत अमेरिकन एक्सप्रेससाठी काही काळ नोकरी केली. २००३ मध्ये त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख बनवण्यात आले. भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध सुधारण्यात रमीझचा मोठा वाटा आहे. भारताने केलेला २००४ चा पाकिस्तान दौरा रमीझच्या पुढाकाराने आयोजित केला गेला होता.
आपल्या ओघवत्या वाणीने समालोचन करण्यात तरबेज असलेला रमीझ जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या आवडता समालोचक आहे, यात कसलीही शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
…आणि त्या दिवशी १०० शतकांचा पाया रचला गेला
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या मोठ्या भावाची प्रकृती अस्थिर, रुग्णालयात केलं भरती