बिहार विधानसभा निवडणूकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. आज शनिवारी (७ नोव्हेंबर) शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची लाट राज्यात असल्याचे दिसत आहे. एक्ढिट पोलच्या आकडेवारीनुसार तेजस्वी यादव हे सत्ता स्थापन करु शकतील.
तेजस्वी यादव हे एकेकाळी विराट कोहलीचे संघसहकारी होते. दोघांनीही काही काळ सोबत क्रिकेट खेळले आहे. त्यामुळेच आता एकेकाळी विराटसोबत क्रिकेटचे मैदान गाजवलेले तेजस्वी यादव आता एक्झिट पोलनुसार बिहारचे मुख्यमंत्री होतील की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.
वाचा तेजस्वी यादवची गोष्ट थोडक्यात-
२००३ साली पाटणा शहरातील एका शाळेत क्रिकेटचा सामना सुरु होता. शाळेतील सामना असल्याने व थेट माजी मुख्यमंत्री सामना पाहायला आल्यामुळे स्टेडियम फुल्ल झालं होतं. तेव्हा शाळेतील एक विद्यार्थी आपल्या संघाकडून फलंदाजी करत होता. त्याने एका चेंडूंवर एक सणसणीत षटकार खेचला व गंमत म्हणजे तो चेंडू पडला तो थेट बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या पायाजवळ. लालू प्रसाद तेव्हा प्रेक्षक गॅलरीत व्हीआयपी कक्षात बसले होते. तोच चेंडू हातात घेत ते शेजारी बसलेल्या राजकारण्याला म्हणाले, “पाहा माझ्या मुलाने मला सॅल्युट केलाय.”
तो सणसणीत षटकार मारणारा मुलगा हा दुसरा तिसरा कुणी नसून बिहारच्या तत्कालीन मुख्यमंत्री राबडी देवी व माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी प्रसाद यादव.९ बहीण भावंडांमध्ये तेजस्वी सर्वात लहान. क्रिकेट खेळापायीच तो नववीत असताना नापास झाला होता.
ज्या राज्याच्या राजधानीत त्याने तो खास षटकार मारला होता आता त्याच बिहार राज्याची निवडणूक तेजस्वी प्रसाद यादवच्या नावाभोवती फिरत आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव व माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा हा मुलगा. आई व वडील दोघेही माजी मुख्यमंत्री तर स्वत: माजी उपमुख्यमंत्री व देशातील विधानसभांमधील सर्वात युवा विरोधी पक्षनेता अशी त्याची सध्याची ओळख. तेजस्वीची राजकारणी म्हणून जेवढी ओळख देशाला आहे तेवढी क्रिकेटर म्हणून फारच क्वचीत लोकांना माहित आहे. तेजस्वीचे सध्याचे वय ३० वर्ष व ३३१ दिवस असून त्याला क्रिकेट सोडून आता जवळपास ७ वर्ष झाली आहेत.
एक दिवस भारतीय संघाकडून क्रिकेट खेळावे आणि एक यशस्वी क्रिकेटपटू व्हावे, असे त्याचे स्वप्न होते. मात्र, त्याच्या नशिबात काही वेगळेच लिहिले गेले होते. तेजस्वी भलेही क्रिकेटच्या मैदानावर स्टार झाला नाही परंतु बिहारच्या राजकारणात आज तो एक स्टार राजकारणी आणि मुरब्बी नेता म्हणून ओळखला जातो.
सौरव तिवारी कर्णधार असताना झाली होती संघात निवड
सईद मुश्ताक अली स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर २००९ साली पहिल्यांदाच तेजस्वीची झारखंड संघात निवड झाली होती. तेव्हाचा भारताचा अंडर १९चा स्टार फलंदाज सौरव तिवारी झारखंडचा कर्णधार झाला होता तर तेजस्वीला त्याच्याच नेतृत्त्वाखाली संघात स्थान देण्यात आले होते. तेव्हा माध्यमांत आलेल्य़ा काही वृत्तांमध्ये ‘राजकारण्याच्या मुलाला संघात स्थान’ असे मथळे छापले होते. याच हंगामात त्याने झारखंडकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले. आपला विसावा वाढदिवस साजरा केल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिला व एकमेव सामना खेळला. विदर्भाविरुद्ध झालेल्या या सामन्यात त्याला गोलंदाजी व फलंदाजी विभागात विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत २ सामने खेळले परंतू त्यातही तो विशेष कामगिरी करु शकला नाही.
आयपीएलमध्ये दिल्ली संघाने केले होते करारबद्ध
तेजस्वी यादव आयपीएलमध्येही सहभागी झाला होता. आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सदस्य झाला होता. परंतु, दिल्लीकडून तो कधीही मैदानात उतरला नाही. तरीही तब्बल ४ हंगाम तो दिल्ली संघाबरोबर होता. एकही सामना न खेळता केवळ संघाचा भाग असल्यामुळे तेजस्वीला ३० ते ४० लाख त्या तीन वर्षांत मिळाले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री होते. पुढे २०१० साली तो आयपीएलमध्ये करारबद्ध असतानाही लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर तो प्रचारात उतरला होता. लालू प्रसाद यादव त्यावेळी तेजस्वीमध्ये मोठा नेता होण्याची तयारी करत होते.
विराटसोबत १९ वर्षाखालील संघात तेजस्वीचा होता सहभाग
तेजस्वी यादव हा विराट कोहली कर्णधार असलेल्या १९ वर्षे वयोगटाखालील संघाचाही सदस्य होता. तसेच त्याने विविध वयोगटात विराटबरोबर किंवा विराटच्या संघाविरुद्ध अनेक वेळा क्रिकेट खेळले आहे
अष्टपैलु खेळाडू म्हणून तेजस्वीचे संघात असायचे नाव
तेजस्वी यादव हा एक उत्तम फिरकी गोलंदाज होता. तसेच त्याने गोलंदाजीत अनेकदा आवश्यक ते बदलही केले होते. संघाकडून खेळताना तो नेहमी तळातील फलंदाज म्हणून मैदानावर उतरत असे. अनेकदा त्याने आपल्या फलंदाजीची चुनूक प्रतिस्पर्धी संघाला दाखवली होती. अशा प्रकारे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने संघातील आपले स्थान पक्के केले होते.
तेजस्वीची क्रिकेट कारकिर्द
आपल्या छोट्याशा क्रिकेट कारकिर्दित तेजस्वीने फक्त एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. त्यात त्याने एका डावात 19 धावा केल्या आहेत. त्या व्यतिरिक्त तेजस्वीच्या खात्यात २ अ दर्जाचे सामने आणि ४ ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांची नोंद आहे. हे सर्व सामने तो झारखंडकडून खेळला आहे.
जवळचा मित्र म्हणून तेजस्वीला विराटचे नेहमीच कौतुक
क्रिकेटपासून दुर गेल्यावर तेजस्वी यादवने राजकारणात आपली घोडदौड सुरु केली. मात्र, क्रिकेट खेळत असताना तो विराट आणि इतर खेळाडूंचा अतिशय चांगला मित्र होता. २०१४ साली तेजस्वीने एका फेसबुक पोस्टद्वारे जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. त्याने विराट आणि इतर सहकाऱ्यांसोबतचा एक फोटा शेअर केला होता. ज्यात त्याने विराटचे कौतुक केले होते.
तेजस्वी यादवची फेसबुक पोस्ट
“दृढ निश्चयी आणि आत्मविश्वास असणारा क्रिकेटचा खेळाडू म्हणजेच विराट कोहली” अशी पोस्ट तेजस्वीने त्यावेळी केली होती.
https://www.facebook.com/tejashwiyadav/photos/a.546471222042154/817645561591384/?type=3
क्रिकेटपटू म्हणून तेजस्वी यादवची एक खास गोष्ट
जेव्हा तेजस्वी क्रिकेट खेळत असे, तेव्हा त्याचे केस मोठे असत. तो अगदी धोनीसारखेच लांब केस ठेवायचा. त्याला धोनीची स्टाईल खूप आवडत असे. हे त्याने एकदा कबूल केले होते.
क्रिकेटच्या नसेल तरिही राजकारणाच्या मैदानावर तेजस्वी यशस्वी
एक यशस्वी क्रिकेटपटू व्हायचे हे तेजस्वी यादवचे स्वप्न काही पुर्ण होऊ शकले नाही. मात्र, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांचा मुलगा म्हणून राजकारणात उतरल्यानंतर तेजस्वीची राजकीय घोडदौड जोरात सुरु आहे. अगदी कमी काळात त्याने बिहारच्या राजकारणात आपला ठसा उमटवला असून बिहारचे उपमुख्यमंत्री पद देखील भुषवले आहे. सध्या देशातील कोणत्याही राज्यातील विरोधी पक्षनेत्यांपेक्षा सर्वात युवा विरोधी पक्षनेता म्हणून त्याकडे पाहिले जाते.
वाचा- तेव्हा विराट लालू प्रसाद यादवांच्या मुलाच्या नेतृत्त्वाखाली खेळत होता, मी त्याला पाहिले…