भारतीय क्रिकेट संघाने १९८३ सालचा विश्वचषक जिंकला आणि जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या दबदब्याला सुरुवात झाली होती. विश्वचषक जिंकून दोन वर्ष होत नाहीत तोच, ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट’ ची घोषणा झाली. व्हिक्टोरियातल्या युरोपियन सेटलमेंटच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त ही स्पर्धा भरविण्यात येणार होती. त्यावेळी कसोटी संघाचा दर्जा असलेले संघ या स्पर्धेत सहभागी होणार असे निश्चित करण्यात आले.
कसोटी खेळणाऱ्या सात संघांना दोन गटात विभागले गेले. सर्वच सामने पांढऱ्या चेंडूने आणि रंगीत कपड्यात खेळवले जाणार होते. त्याचप्रमाणे प्रथमच दिव्यांच्या प्रकाशझोतात ही स्पर्धा पार पडणार होती.
‘अ’ गटात विश्वविजेत्या भारतासह पाकिस्तान, यजमान ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचा समावेश होता. ‘ब’ गटात न्यूझीलंड, वेस्ट इंडीज व श्रीलंकेचा समावेश केला गेलेला. भारत विश्वविजेता असला तरी स्पर्धेतील संभाव्य विजेते म्हणून ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीजकडे पाहिले जात होते. मात्र, स्पर्धेच्या वेळी सर्वांना धक्का देत अ गटामधून भारत व पाकिस्तानने उपांत्य फेरीत जागा निश्चित केली तर, ब गटातून अपेक्षेप्रमाणे वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत जाण्याचा मान मिळवला. यजमान ऑस्ट्रेलियावर पहिल्याच फेरीत बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत जागा बनवली. तर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात फेवरेट म्हटल्या गेलेल्या वेस्ट इंडीजला पराभूत करून पाकिस्तानने प्रथमच कोणत्याही प्रमुख स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याचा मान मिळवला. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या पराभूत झालेल्या संघांमध्ये तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला लोळवत स्पर्धेची विजयी सांगता केली.
ऐतिहासिक अंतिम सामना
फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी प्रथमच कोणत्याही मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. मेलबर्नच्या जगातील सर्वात मोठ्या मैदानावर १० मार्च १९८५ या दिवशी एक ऐतिहासिक लढत चाहत्यांना पाहायला मिळणार, याची खात्री सर्वांना झाली होती. सुनील गावसकर आणि जावेद मियाँदाद यापैकी ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट’ ची ट्रॉफी कोण उंचावणार? याची सर्वांना आतुरता लागली.
पाकिस्तानची सन्मानजनक धावसंख्या
पाकिस्तानी कर्णधार जावेद मियादाद यांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी आपल्या संघात एक-एक बदल केला होता. पाकिस्तान वासिम अक्रमऐवजी अझीम हफीज तर, भारताने रॉजर बिन्नीऐवजी चेतन शर्मा यांना संधी दिली.
भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार व प्रमुख वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला देत पाकिस्तानची अवस्था ३ बाद २९ अशी केली. चेतन शर्मा यांनी उपांत्य सामन्याचा नायक ठरलेल्या रमीज राजा यांना बाद करत पाकिस्तानला आणखी संकटात टाकले. कर्णधार मियाँदाद व अनुभवी इम्रान खान यांनी पाचव्या गड्यासाठी ६८ धावा जोडून पाकिस्तानचा डाव सावरला. विशेष म्हणजे, हे दोन्ही फलंदाज डावाच्या सुरुवातीलाच बाद झाले होते, मात्र पंचांनी चुकीचे निर्णय दिल्याने हे दोघेही बचावले होते.
इम्रान खान धावबाद होऊन परतल्यानंतर, पाकिस्तानचे इतर गडी नियमित अंतराने बाद होत गेले. पाकिस्तानसाठी सर्वाधिक ४८ धावा कर्णधार मियादाद यांनी काढल्या. अखेर, मजल-दरमजल करत पाकिस्तानचा डाव निर्धारित ५० षटकात ९ बाद १७६ या धावसंख्येवर थांबला. भारतासाठी कपिल देव यांनी सर्वाधिक चार तर १९ वर्षीय युवा लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी तीन गडी बाद केले. चेतन शर्मा व रवी शास्त्री यांच्या खात्यातदेखील प्रत्येकी एक बळी जमा झाला.
…आणि भारताने केले जेतेपद आपल्या नावे
पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे आव्हान भारतासाठी सोपे होते. स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रवी शास्त्री व कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी कोणताही दबाव न घेता धावांच्या पाठलागाला सुरुवात केली. दोघांनीही पाकिस्तानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत पहिल्या गड्यासाठी १०३ धावा जोडून भारताचा विजय जवळपास नक्की केला. श्रीकांत यांनी ७७ चेंडूत आक्रमक ६७ धावांची खेळी केली. तिसऱ्या स्थानी आलेल्या मोहम्मद अझरुद्दीननेदेखील २५ धावांचे योगदान देत भारताला विजयाच्या नजीक आणले. अखेरीस, रवी शास्त्री (६३) व दिलीप वेंगसरकर (१८) या मुंबईकर जोडीने नाबाद राहत भारताच्या पारड्यात विजेतेपदाचा मान टाकला. विश्वचषक विजेतेपदापाठोपाठ ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट’ ची चमकदार ट्रॉफी सुनील गावसकर यांच्या हातात झळकत होती.
रवी शास्त्री यांची धमाकेदार कामगिरी
सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांच्यासाठी ही स्पर्धा त्यांच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीची ‘हायलाईट’ म्हणता येईल अशी घटली. सुरुवातीच्या दोन सामन्यात अपेक्षित कामगिरी त्यांच्याकडून झाली नाही. मात्र, अखेरच्या साखळी सामन्यात व उपांत्य तसेच, अंतिम सामन्यात त्यांनी अर्धशतके झळकावली. संपूर्ण स्पर्धेत सलामीवीर म्हणून खेळताना त्यांनी १८२ धावा व ८ बळी आपल्या नावे करत मालिकावीर म्हणून दिला जाणारा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा पुरस्कार आपल्या नावे केला. सोबतच, शास्त्री यांना ‘ऑडी १००’ ही कार देखील भेट देण्यात आली होती. पुढे, तत्कालिन भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आदेशानुसार ‘कस्टम ड्युटी’ माफ करत शास्त्री यांना ही कार सुपूर्द करण्यात आली.
भारतीय क्रिकेट संघाने या विजयानंतर आंतरराष्ट्रीय पटलावर अनेक संस्मरणीय विजय साजरे केले. मात्र, या स्पर्धेच्या आणि रवी शास्त्री यांच्या ऑडीच्या गप्पा आजही लोक चांगल्याच रंगवून सांगतात.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष! बॉलिवूडच्या ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख खान
एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक
किरण नवगिरेचा सोलापूरी झटका! तुफानी अर्धशतकासह ‘या’ विक्रमात ठरली नंबर वन