टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून शनिवारी (७ ऑगस्ट) भारत देशासाठी एक ऐतिहासिक बातमी समोर आली होती. भारताचा पुरुष भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील ऍथलेटिक्स प्रकारातील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या सुवर्ण पदकानंतर संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारांनी त्याला बक्षिसे जाहीर केली. एका रात्रीत भारतीय क्रीडाविश्वाचा ‘पोस्टर बॉय’ बनलेल्या नीरज चोप्राने आपल्या या सुवर्ण कामगिरी दरम्यानच्या डायटबाबत एक महत्त्वपूर्ण खुलासा केला.
हा पदार्थ आहे नीरजच्या आवडीचा
ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. यासाठी खेळाडू मेहनतीसोबत आपल्या आहारावरही विशेष लक्ष देतात. मात्र, नीरज याला अपवाद ठरला. कारण, नीरजला त्याच्या डाएटमध्ये चक्क पाणीपुरी खाण्याची परवानगी दिली गेली आहे.
याबाबत एका मुलाखतीत बोलताना नीरज म्हणाला, “हो, मला पाणीपुरी खाण्याची परवानगी आहे. कारण, त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. पापडीमध्ये मैद्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने ते शरीरासाठी हानिकारक नाही. मी आठवड्यातून एकदा तरी पाणीपुरी खातोच. कधीतरी पाणीपुरी खाल्ल्याने याचे नुकसान होणार नाही.”
यासोबतच नीरजला आपल्या आईच्या हातचा चुरमा हा पदार्थ देखील आवडतो. सुवर्णविजेत्या नीरजची आई तो मायदेशी परतल्यानंतर त्याला आपल्या हाताने चुरमा खाऊ घालण्यास उत्सुक आहे.
नीरजने जिंकले सुवर्णपदक
ऑलिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी नीरज चोप्रा याला सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत हे सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले. अंतिम फेरीतील सहा प्रयत्नांपैकी दुसऱ्या प्रयत्नातच ८७.५८ मीटरचा भाला फेकून त्याने आपले एक पदक निश्चित केले होते. त्याचे प्रतिस्पर्धी खेळाडू इथपर्यंत पोहोचू न शकल्याने नीरज सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
नीरजने जिंकलेले हे सुवर्ण पदक भारताने ऍथलेटिक्समध्ये जिंकलेले ऑलिम्पिक इतिहासातील पहिले पदक आहे. तसेच, कोणत्याही भारतीय खेळाडूने वैयक्तिक प्रकारात जिंकलेले हे केवळ दुसरे सुवर्ण ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीरने केली नव्या टी२० लीगची घोषणा, खेळाडूंना मिळणार ‘या’ सुविधा
आयपीएल २०२१ साठी बीसीसीआयचे सूक्ष्म नियोजन, ‘असे’ असतील बायो-बबलचे नवीन नियम
दिनेश कार्तिक आता तमिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही, ‘हा’ खेळाडू आहे त्याला कारण