आजपासून सुरु झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आज क्रिकेट कारकिर्दीत एक महत्वाची कामगिरी केली आहे.
त्याने या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमची विकेट घेऊन त्याच्या कसोटी कारकिर्दीत ४०० विकेट्स घेण्याचा महत्वाचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा दुसराच गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने हा टप्पा पार केला आहे.
हा इंग्लडचा पहिला दिवसरात्र सामना आहे. या सामन्यात पहिल्या सत्रानंतर ब्रॉडच्या गोलंदाजीवर लॅथमचा झेल ख्रिस वोक्सने स्क्वेयर लेगला घेतला आणि ब्रॉडच्या 400व्या विकेटवर शिक्कामोर्तब झाले.
यावेळी ब्रॉडचे अभिनंदन करण्यासाठी मैदानातील इंग्लडचे सर्व खेळाडू त्याच्याकडे धावले. त्यामुळे त्याच्यासाठी हा क्षण आनंददायी ठरला. ब्रॉडने आजपर्यंत 115 कसोटी सामने खेळले असून यात 29.32 च्या सरासरीने 400 विकेट्स घेतल्या आहेत.
आज प्रथम फलंदाजी करताना इंग्लडचा पहिला डाव अवघ्या 58 धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे न्यूझीलंडची या सामन्याची सुरुवात चांगली झाली. आज दिवसाखेर न्यूझीलंडने ३ बाद १७५ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड कर्णधार केन विलियम्सनने नाबाद अर्धशतक केले असून तो या सामन्यात शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तसेच त्याच्याबरोबर हेन्री निकोलस नाबाद खेळात आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे इंग्लडचे गोलंदाज –
जेम्स अँडरसन – 523*
स्टुअर्ट ब्रॉड – 400*
इयान बोथाम – 383
बॉब विलीस – 325
फ्रेड ट्रूमॅन – 307