पुणे | तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ व्या स्पारिंग व ८ व्या पुमसे राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत मुलींच्या १६ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या अनुष्का भाजीभाकरे (जैन) हिने सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या गौरी कीरने रौप्यपदक मिळवले.
खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियम ही स्पर्धा सुरू आहे. तब्बल ९ वषार्नंतर ही स्पर्धा महाराष्ट्रात होत आहे. या स्पधेर्चे उद्घाटन पुणे महापालिकेचे अतिरक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी प्रभात कुमार शर्मा, संजयकुमार शर्मा, सुमीरकुमार शर्मा, सुरेश परमार, विनोद कुमार, रामपुरी गोस्वामी, सुभाष नायर, दिपक शिर्के, अमर बावरी, संदीप ओंबासे, विजयशंकर विश्वकर्मा यांच्या हस्ते झाले.
यावेळी सुरेश चौधरी, तुषार आवटे, डॉ. प्रसाद कुलकर्णी, पद्माकर कांबळे, रुपेश शिंदे उपस्थित व इतर पदाधिकारी होते.
या स्पधेर्तील मुलींच्या १६ किलो वजनी गटात अनुष्काने सुवर्णपदकाची कमाई केली. आंध्र प्रदेशच्या बी. तेजस्वनीने रौप्यपदक, तर दीव-दमणच्या हर्षिता साचन आणि उत्तर प्रदेशच्या शांभवी कुमारी यांनी ब्राँझपदक मिळवले.
मुलींच्या २० किलो वजनी गटात तमिळनाडूच्या पी. हर्षिनीने सुवर्णपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या गौरी कीरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशच्या अनुष्का साहू आणि चंडीगडच्या सेहजप्रीत कौरने ब्राँझपदक पटकावले.
यानंतर स्पर्धेतील मुलींच्या २४ किलो वजनी गटात दिल्लीच्या गौरांशी वशिष्ठाने सुवर्णपदक मिळवले. केरळच्या अथुल्या पी. ने रौप्यपदक पटकावले. उत्तराखंडच्या कृष्ण साह आणि कर्नाटकाच्या इंझिला नवाझने ब्राँझपदक मिळवले.
या स्पर्धेतील मुलांच्या १६ किलो वजनी गटात चंडीगडच्या अंश दुबेने सुवर्णपदक मिळवले. त्याने आंध्र प्रदेशच्या टी. अशोकला मागे टाकले. मध्य प्रदेशच्या टी. यशवर्धनसिंह तोमर आणि पाँडिचेरीच्या बी. किशोरने ब्राँझपदक मिळवले. स्पर्धेतीलल मुलांच्या २७ किलो वजनी गटात उत्तराखंडच्या ओम पाल साहने सुवर्णपदक पटकावले.
झारखंडच्या तिलेश्वर साहूने रौप्यपदक मिळवले. राजस्थानच्या इंद्र्रजितसिंह आणि आंध्र प्रदेशच्या जी. दिनेश आदित्यला ब्राँझपदक मिळवले. पूमसे प्रकारात वैयक्तिक गटात तष्निक भूयनने सुवर्णपदक मिळवले, तर ए. पृथ्विराजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आसामचा क्षितीज प्रधान आणि गुजरातच्या ध्येय पनसुर्या यांनी ब्राँझपदक मिळवले.