---Advertisement---

वयाच्या चौथ्या वर्षापासूनचा एमएस धोनीचा खास मित्र म्हणाला, त्याने आम्हाला…

On: सोमवार, ऑगस्ट 17, 2020 9:58 PM
---Advertisement---

मुंबई । एमएस धोनीचे क्रिकेट विश्वात अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेला निवृत्तीचा निर्णय अनेक चाहत्यांना धक्का देऊन गेला. चाहत्यांबरोबरच धोनीच्या निकटवर्तीयांसाठीही त्याच्या निवृत्तीचा क्षण खूप भावूक करणारा ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा धोनीच्या निर्णयानंतर त्याच्या जवळच्या मित्रांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे मित्र त्याच्या संघर्षाच्या दिवसांचे साक्षीदार आहेत. माहीसारखा ‘कोहिनूर’ यापुढे क्रिकेट जगताला मिळणार नाही, असे त्यांना वाटते.

वयाच्या चौथ्या वर्षापासून धोनीचा मित्र असलेला सीमंत लोहानी उर्फ चिट्टू पीटीआयशी बोलताना म्हणाला, “माहीबद्दल मी काय बोलू?” त्याने आम्हाला खूप हसण्याची संधी दिली. त्याच्या इतक्या आयसीसी ट्रॉफी कुठल्याच कर्णधाराने आतापर्यंत जिंकून दिल्या नाहीत. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. तो भारतीय क्रिकेटचा कोहिनूर आहे. येणार्‍या काळात अनेक महान खेळाडू येतील पण धोनीसारखा कोणी नसेल.”

यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर तो जुन्या मित्रासारखाच आहे काय, असे विचारले असता लोहानी म्हणाला, “जर एखादा माणूस सेलिब्रिटी बनला तर तो मित्रांना थोडा विसरतो. जर आपण त्याला भेटला असेल तर मग असा प्रश्न मनात येऊ नये.” धोनीवर बनवलेला ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात त्याचे सर्वात चांगले मित्र लोहानी, परमजीत सिंग आणि छोटू भैय्या यांचे महत्त्वपूर्ण पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लोहानीचा वाढदिवस धोनीच्या फार्महाऊसवर झाल्याचे अनेक व्हायरल झालेल्या फोटोंमधून दिसले होते.

तो म्हणाला, ‘नर्सरीच्या वर्गात असल्यापासून मी त्याचा मित्र आहे. तो त्याच्या कारकीर्दीत व्यस्त झाला. त्याने बरेच चढउतार पाहिले आहेत. पण अजूनही तो मनातून रांचीचा मुलगा आहे. त्याच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही,” असे लोहानी याने सांगितले.

धोनीबरोबर घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांबद्दल विचारले असता तो म्हणाला, “जेव्हापासून माही क्रिकेट खेळला आहे, तेव्हापासून त्याने आमच्यासाठी बर्‍याच गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे एक उत्तम क्षण लक्षात ठेवणे कठीण आहे. लोक विचारतात तुम्ही त्यांना भेटता का? तर आमचे उत्तर असे आहे की तुम्ही फोटो छापला आहे तर तुम्हाला दिसत नाही? असो, हे सर्व खाजगी आहे, आपण सर्वांसोबत हे शेअर का करावे?”

सार्वजनिक जीवनात अतिशय खासगी असलेल्या मित्रांमध्ये धोनी कसा आहे? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले,“ तो मित्रांमध्ये गप्प बसत नाही. मित्रांसोबत असताना तो अनेक गोष्टी शेअर करतो. प्रत्येकाबरोबर मजाही करतो. पण तो आपापसात क्रिकेटबद्दल बोलत नाही. क्रिकेट खेळणे हे त्याचे काम आहे. परंतु आमच्या चर्चेत अनेक मुद्दे असतात.”

भविष्यात धोनीची भारतीय क्रिकेटमध्ये भूमिका आहे का? असे विचारले असता तो म्हणाला, “आम्ही त्याचे खूप चांगले मित्र आहोत. पण क्रिकेट हे त्याचे प्रेम आहे. भविष्यात तो काय करतो आणि काय निर्णय घेतो, हे तोच ठरवेल. आम्ही त्याच्यावर बोलू करू शकत नाही. ”

धोनीच्या सोळा वर्षांच्या कारकीर्दीत माध्यमांशी कधीच बोलला नसलेला लोहानी म्हणाला, “2004 मध्ये भारतीय संघात निवड झाल्यानंतर मी सर्व माध्यमातील व्यक्तींचा फोन उचलला आणि त्यांनंतर कालच उचलला. दरम्यान, मी 16 वर्षांत कधीच माध्यमांशी बोललो नाही. तेथे कोणतेही कारण नव्हते.”

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---