भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये मोठी खेळी करू शकला नाहीये. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर माजी दिग्गज कर्णधार आणि फलंदाज सुनील गावसकर यांनी शुबमन गिलला एक सल्ला दिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आपला फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी गिलला गावसकरांचा हा सल्ला फायदेशीर ठरू शकतो.
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते शुबमन गिल (Shubman Gill) कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना संयम दाखवत नाहीये. टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये गरजेची असणारी आक्रमकता त्याच्या कसोटी डावातही दिसत आहे. गावसकरानी सांगितल्याप्रमाणे गिलने कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना कमी आक्रमकतेसह फलंदाजी केली पाहिजे. स्टार स्पोर्ट्सवर गावसकर म्हणाले, “मला वाटते तो कसोटी क्रिकेटमध्ये जरा जास्तच आक्रमकतेसह खेळत आहे. कसोटी क्रिकेट खेळताना टी-20 आंतरराष्ट्रीय आणि वनडेच्या तुलनेत परिस्थिती थोटी वेगळी असते.”
“रेड बॉल हवेत आणि खेळपट्टीच्या बाहेर देखील व्हाईट बॉलपेक्षा जास्त फिरतो. या चेंडूला बाऊंस देखील जास्त असतो. गिलने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत,” असेही गावसकर म्हणाले. दरम्यान, मागच्या वर्षभरात (2023) शुबमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये 10 वेळा फलंदाजी केली. यातील फक्त एका सामन्यात त्याला 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करता आली. हा सामना त्याने मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला असून पहिल्या डावात त्याने 128 धावा केल्या होत्या.
दरम्यान, गिल 2023मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगलाच चमकला. त्याने वर्षात खेळलेल्या 29 वनडे सामन्यांमध्ये 63.36च्या सरासरीने 1584 धावा केल्या. तर टी-20 क्रिकेटमध्ये 30 डावात 44.52च्या सरासरीने 1202 धावा केल्या. गावसकरांनी गिल लवकरच फॉर्ममध्ये परतण्याची अपेक्षाही वर्तवली. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात स्वस्तात बाद झालेला गिल दुसऱ्या कसोटीत कसे प्रदर्शन करणार, हे पाहण्यासारखे असेल. 3 जानेवारी रोजी हा सामना केपाटाऊनमध्ये सुरू होईल. (Sunil Gavaskar advises Shubman Gill to improve his Test performance)
महत्वाच्या बातम्या –
‘IPL ही ऑलिम्पिकसारखी’, लखनऊ संघाच्या नवीन प्रशिक्षकाचं जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगबाबत विधान
‘डेव्हिड वॉर्नर फक्त वीरेंद्र सेहवागच्या मागे’, भारताच्या माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक विधान