बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारतीय संघाला 3-1 असा पराभव पत्कारावा लागला. ऑस्ट्रेलियानं सिडनी येथे खेळली गेलेली पाचवी आणि शेवटची कसोटी 6 गडी राखून जिंकत मालिका आपल्या नावे केली. आता भारताच्या या पराभवानंतर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर चांगलेच संतापले आहेत. गावस्कर यांनी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफवर अनेक प्रश्न उपस्थित केले. कोचिंग स्टाफ काय करत होता? असं गावस्कर म्हणाले आहेत.
‘स्टार स्पोर्ट्स’वर बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “भारताचा कोचिंग स्टाफ काय करत होता? बॉलिंग कोच, बॅटिंग कोच काय करत आहेत? बॅटिंग कोच बघा, न्यूझीलंडविरुद्ध संघ 46 रन्सवर ऑलआऊट झाला. त्यानंतर बाकी सामन्यातही आपण हरलो, आमच्या फलंदाजीत दम नाही. आता प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही किती सुधारणा केली?”
गावस्कर पुढे म्हणाले, “असे अनेक चांगले चेंडू होते, ज्यांचा सामना आमचे फलंदाज करू शकले नाहीत. ते ठीक आहे. जर चांगला गोलंदाज आणि चांगला चेंडू असेल तर कोणतीही अडचण नाही. उत्तम चेंडू आल्यावर महान खेळाडूंनाही अडचणींचा सामना करावा लागतो. पण असं होत नसेल तर तुम्ही मला सांगा तुम्ही काय केलं? तुम्ही म्हणाल, याला खेळवायला हवं होतं, तो खेळायला हवा होता. मी विचारतो की पुढे जाऊन आपण या कोचिंग स्टाफला कायम ठेवायला हवं का?”
इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेबाबत बोलताना गावस्कर म्हणाले, “इंग्लंडला जाण्यापूर्वी आपल्याकडे 2-3 महिने आहेत. मी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलत नाहीये. मी पुढे होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल बोलत आहे. मी कसोटी क्रिकेटर होतो. मला एकदिवसीय सामन्यांबद्दल जास्त माहिती नाही. ज्या खेळाडूंनी धावा केल्या नाही, त्यांना जरुर प्रश्न विचारा, मात्र सोबतच कोचिंग स्टाफला देखील विचारा की त्यांनी काय केलं?”
हेही वाचा –
सुनील गावस्कर संतापले! मालिका विजयानंतर ऑस्ट्रेलियानं केला जाहीर अपमान
लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला कसोटी संघात करावे लागतील हे 3 मोठे बदल, रोहित शर्माला वगळणार का?
रोहित-विराटच्या भविष्यावर गौतम गंभीरची मोठी प्रतिक्रिया, पराभवानंतर बोलताना म्हणाला…