---Advertisement---

“रिषभ पंत भविष्यातील कर्णधार आहे, यात कोणतीही शंका नाही”, भारताच्या महान क्रिकेटपटूचे मोठे भाष्य

On: शुक्रवार, मे 14, 2021 2:15 AM
---Advertisement---

गेल्या वर्षभरात क्रिकेटमध्ये सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या क्रिकेटपटूंबद्दल विचारले तर अनेक जण भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे नाव घेतील. पंतने गेल्या काही महिन्यात आपल्या खेळात केलेल्या सुधारणांमुळे आणि आपल्या अफलातून कामगिरीमुळे सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्यामुळे आता अनेक दिग्गज त्याचे कौतुक करत असतात. नुकतेच भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकरांनीही पंतचे कौतुक केले आहे.

गावसरकांनी पंतचे केवळ कौतुकच केले नाही, तर तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधारही बनू शकतो, असे म्हटले आहे. नुकतेच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स संघाचे नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने चांगली कामगिरीही केली.

यानंतर गावसकर यांनी स्पोर्ट्सस्टारसाठी लिहिलेल्या आपल्या स्तंभात पंतबद्दल म्हटले आहे की ‘रिषभ पंतमध्ये शिकण्याची भूक आहे. त्याच्यामध्ये मला एक ठिणगी दिसली, ज्यास जर त्याने नैसर्गिक मार्गाने पुढे जाण्याची परवानगी दिली तर ती ज्वाला बनू शकेल. हो, नक्कीच पंतने चूका केल्या, कोणता कर्णधार चूका करत नाही? पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने शानदार प्रदर्शन केले.’

गावसकरांनी पुढे लिहिले, ‘त्याने काही आयपीएल सामन्यातच दाखवले की तो गोष्टी शिकण्यात हुशार आहे आणि तो हुशारीने अनेक परिस्थितीत वरचढ होता. तो कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी स्वत:ची पद्धत शोधत होता. रिषभ पंत भविष्यातील कर्णधार आहे, यात कोणतीही शंका नाही. असे यासाठी म्हणत आहे कारण त्याने दाखवून दिले आहे की प्रतिभेला संधी तेव्हाच मिळते जेव्हा सुधारणेचीही त्याला जोड मिळते.’

पंतची कामगिरी
नुकतीच आयपीएल २०२१ हंगाम कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. या हंगामात पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत होता. त्याने कर्णधार म्हणून या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दिल्लीने पंतच्या नेतृत्वाखाली ८ सामने खेळले होते. त्यातील ६ सामने जिंकण्यात त्यांना यश मिळाले, तर २ सामने ते पराभूत झाले. त्यामुळे १२ गुणांसह ते स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होते. विषेश म्हणजे पंत पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद सांभाळत होता.

याशिवाय पंतची फलंदाज म्हणूनही या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी झाली. पंतने या आयपीएल हंगामात ८ सामन्यात २ अर्धशतकांसह ३५.५० च्या सरासरीने २१३ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

तीन वेळचा आयपीएल विजेता खेळाडू धावून आला कोरोना विरुद्धच्या युद्धात मदतीला; ‘इतक्या’ लाखांची दिली देणगी

पृथ्वी शॉचा सावळा गोंधळ! ई-पास विना गोव्याला निघाल्यानं अंबोलीत पोलिसांनी रोखलं, मग काय झालं वाचा सविस्तर

‘असे’ झाले तर पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिर खेळणार आयपीएल? वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---