भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी ही स्पर्धा खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. पण भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट कसोटीत नि:शब्द असली तरी, महान फलंदाज सुनील गावसकरांना विश्वास आहे की, ऑस्ट्रेलियाच्या मागील दौऱ्यांमध्ये पर्थ आणि ॲडलेडमध्ये चमकदार खेळी करणारा चॅम्पियन फलंदाज विराट 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतेल.
(22 नोव्हेंबर) पासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेपूर्वी गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “विराट न्यूझीलंडविरूद्ध धावा करू शकला नाही, त्यामुळे त्याला धावांची भूक लागेल. मागच्या वेळी ॲडलेड कसोटीत, जेव्हा संपूर्ण भारतीय संघ दुसऱ्या डावात 36 धावांत बाद झाला होता, तेव्हा मला आठवते, कोहलीने धावबाद होण्यापूर्वी पहिल्या डावात 70 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले, “याशिवाय, कोहलीने ॲडलेडमध्ये नेहमी धावा केल्या आहेत, त्याने 2018-19 मध्ये पर्थमध्ये उत्कृष्ट कसोटी शतक झळकावले, हे त्याच्या सर्वात शानदार कसोटी शतकांपैकी एक आहे, या खेळीमुळे त्याला अतिरिक्त आत्मविश्वास मिळेल, सुरुवातीला नशिबाची गरज आहे आणि जर त्याने चांगली सुरुवात केली तर तो मोठी खेळी खेळेल.”
विराट कोहलीचा (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरूद्ध उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 25 कसोटी सामन्यांच्या 44 डावांमध्ये 2,042 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने 5 अर्धशतकांसह 8 शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीच्या नावावर 13 कसोटी सामन्यांच्या 25 डावांमध्ये 1,352 धावा आहेत. दरम्यान त्याने 13 अर्धशतकांसह 6 शतके झळकावली आहेत.
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणाले की, “ऑस्ट्रेलियन गोलंदाज विराटकडे ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतील. मला वाटते की विराटला माहित असेल त्याच्याविरूद्ध काय रणनीती असू शकते, तो ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेले जास्तीत जास्त चेंडू सोडून देऊ शकतो.”
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आझमने मोडला विराटचा रेकाॅर्ड! आता नंबर रोहितचा
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत सर्वोच्च धावसंख्या करणारे खेळाडू (टाॅप-5)
69 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेटपटू डोपिंगमध्ये दोषी, एका महिन्याच्या बंदीची शिक्षा