भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी (23 जून) भारताच्या कसोटी वनडे संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्याकडे जबाबदारी कायम ठेवली आहे. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून पुनरागमन केलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. रहाणेला ही जबाबदारी मिळाल्यानंतर अनेक जण त्याचे कौतुक करत असतानाच, भारताचे माजी कर्णधार व सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी निवड समितीच्या या निर्णयावर टीका केली आहे.
तब्बल दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत असताना त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पहिल्या डावात 89 तर दुसऱ्या डावात 46 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात नियमित सदस्य होऊ शकतो, असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटले होते. त्यानंतर आता त्याला थेट संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. निवड समितीचा हा निर्णय गावसकर यांना पटला नाही. ते म्हणाले,
“अजिंक्यला पुन्हा एकदा कसोटी संघाचा उपकर्णधार बनवून निवड समितीने काय सिद्ध केले हे मला माहीत नाही. मला विचाराल तर एखाद्या युवा खेळाडूला ते स्थान मिळायला हवे होते. शुबमन गिल व अक्षर पटेल त्यासाठी उत्तम पर्याय असते.”
गिल याने सलामीवीर म्हणून भारतीय संघातील आपली जागा निश्चित केली आहे. तसेच त्याला भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून देखील मानले जाते. दुसरीकडे अक्षर याची विदेशातील कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघातील जागा पक्की नसते.
(Sunil Gavaskar Not Happy With Ajinkya Rahane Again Become Test Vice Captain)
महत्वाच्या बातम्या-
जशी कमाई, तसा खर्च! विराटच्या नवीन घड्याळाची किंमत ऑडी कारच्या किंमतीपेक्षा जास्त, आकडा तर वाचाच
‘आता रणजी खेळणं बंद कर…’, विंडीज दौऱ्यासाठी निवडकर्त्यांकडून सरफराजकडे दुर्लक्ष, संतापले गावसकर