सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वाची नजर पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२१ वर आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. तत्पूर्वी क्रिकेट बोर्ड आणि संघ या स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. काही बोर्डांनी तर त्यांचे १५ सदस्यीय संघही घोषित केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयसुद्धा लवकरच आपल्या टी२० विश्वचषक संघाची घोषणा करू शकते. तत्पूर्वी भारताचे माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी टी२० विश्वचषकासाठी संभाव्य संघाची निवड केली आहे.
स्पोर्ट्स तकने आयोजित केलेल्या चर्चा सत्रादरम्यान त्यांनी विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची नियुक्ती केली आहे. गावसकरांनी आपल्या संघात भारताचा धाकड सलामीवीर शिखर धवनला संधी दिलेली नाही. धवन हा गेल्या २ आयपीएल हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहिला आहे. तरीही त्यांनी धवनला संघाबाहेर ठेवण्याच्या आपल्या निर्णयाने सर्वांना चकित केले आहे.
‘लिटल मास्टर’ गावसकरांनी टी२० विश्वचषकासाठी फॉर्मात असलेला सलामीवीर रोहित शर्मा याची निवड केली आहे. रोहितच्या जोडीला त्यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीला सलामीसाठी ठेवले आहे. तर आयपीएलमध्ये धावांची बरसात करणाऱ्या केएल राहुलला बॅकअप सलामीवीर आणि यष्टीरक्षक म्हणून जागा दिली आहे. तसेच गावसकरांनी तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीलाच वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. सूर्यकुमारच्या साथीला मधल्या फळीत मुंबई इंडियन्सच्या आणखी २ फलंदाजांना निवडले आहे. यामध्ये हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, मधळ्या फळीचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या श्रेयस अय्यरला त्यांनी आपल्या संघात जागा दिलेली नाही. अष्टपैलू विभागात वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजा आहेत. सुंदरला त्याच्या तंदुरुस्तीच्या आधारावर टी२० विश्वचषकात खेळवायचे की नाही? हा निर्णय घेतला जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचे हाताचे बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे तो आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर झाला आहे. रिषभ पंत यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडेल.
याखेरीज गोलंदाजी विभागात गावसकरांनी ५ वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूला स्थान दिले आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांचा वेगवान गोलंदाजी विभागात समावेश आहे. तर एकमेव फिरकीपटू म्हणून त्यांनी युझवेंद्र चहलला निवडले आहे.
टी२० विश्वचषकासाठी सुनिल गावसकरांनी निवडलेला १५ सदस्यीय भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर (फिटनेसच्या आधारावर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दिपक चाहर, शार्दुल ठाकुर आणि युजवेंद्र चहल
महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या कसोटीतील इंग्लंडच्या दारुण पराभवानंतर संतापला माजी क्रिकेटर; म्हणाला, ‘लाज वाटते…’