बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जातोय. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. रहाणेने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकत, भारताला मजबूत स्थितीत आणले. या शतकानंतर सर्वजण विराटचे कौतुक करत आहेत. भारताचे माजी कर्णधार व दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांनीदेखील रहाणेच्या खेळीची तोंडभरून स्तुती केली.
रहाणेने झळकावले दमदार शतक
भारतीय संघ मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अडचणीत आला होता. चेतेश्वर पुजाराच्या रूपाने ६३ धावसंख्येवर भारताने तिसरा गडी गमावला तेव्हा अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, अजिंक्य रहाणेने संयमी खेळी करत या अडचणींवर मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाला दुसर्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ५ गड्यांच्या बदल्यात ९१.३ षटकात २७७ धावांचा डोंगर उभा करून दिला. यामध्ये अजिंक्य रहाणेने १०४ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याबरोबर जडेजाने सुद्धा नाबाद ४० धावा जोडल्या.
सुनील गावसकरांनी केले रहाणेचे कौतुक
भारताचे माजी कर्णधार व सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी या शतकी खेळीनंतर रहाणेचे तोंडभरून कौतुक केले. गावसकर म्हणाले, “हे एक अप्रतिम कसोटी शतक होते. गोलंदाजांना मदतगार असणाऱ्या खेळपट्टीवर एक असामान्य खेळी कशी करावी याचे उत्तम उदाहरण रहाणेने घालून दिले. ही अशी खेळपट्टी आहे, ज्यावर कोणत्याही फलंदाजाला तो स्थिर झाला आहे असे वाटणार नाही. चेंडूला कमी-अधिक प्रमाणात उसळी मिळत आहे. लायनचा चेंडूदेखील वळण घेऊ लागलाय.”
गावसकर यांच्यासोबतच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग व भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने देखील रहाणेचे कौतुक केले होते. गावसकर यांनी दोन दिवसापूर्वीच, ‘मी स्वतः मुंबईकर असल्याने रहाणेचे कौतुक करत नाही. मी रहाणेचे कौतुक केले तर लोक माझ्यावर पक्षपातीपणाचा आरोप लावतील’, असे म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : रहाणे-जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर
– आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कोहलीच किंग; या भारतीय फिरकीपटूलाही मिळाले स्थान
– NZ vs PAK : पहिल्या डावात न्यूझीलंडचा ४३१ धावांचा डोंगर, प्रत्युत्तरात पाकिस्तानची अडखळती सुरुवात