ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचं भविष्य धोक्यात आलं आहे. यानंतर आता पुढील कर्णधाराबद्दल चर्चा जोरात सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी रोहितनंतर भारताचा कर्णधार कोण होणार? त्याचं नाव सांगितलं.
सुनील गावस्कर म्हणाले की, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहनं पाच सामन्यात 32 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियात कोणत्याही परदेशी वेगवान गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता.
एका वाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले, “तो (बुमराह) संघाचा पुढील कर्णधार असू शकतो. तो मोठ्या जबाबदारीनं संघाचं नेतृत्व करतो. त्याची प्रतिमा खूप चांगली आहे. त्याच्यात नेतृत्व गुण आहेत. तो असा माणूस नाही ज्याच्यावर अनावश्यक दबाव येईल.” सुनील गावस्कर पुढे बोलताना म्हणाले, “कधीकधी असे कर्णधार असतात जे तुमच्यावर खूप दबाव आणतात. बुमराहकडे पाहून असं वाटतं की, तो तुमच्याकडून ते काम करण्याची अपेक्षा ठेवतो, जे तुमचं काम आहे. परंतु यासाठी तो कोणावरही दबाव आणत नाही.”
बुमराह गेल्या काही वर्षांपासून भारतीय वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व करत आहे. त्याच्या मार्गदर्शनामुळे मोहम्मद सिराजसारख्या खेळाडूंना वेगवान गोलंदाज म्हणून विकसित होण्यास मदत झाली. गावस्कर म्हणाले, “बुमराह मिड-ऑफ, मिड-ऑन अशा दोन्ही ठिकाणी उभा राहतो. त्याची उपस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर असते. तो गोलंदाजांसोबत त्याचे विचार शेअर करण्यास तयार असतो. तो कर्णधार झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही.”
हेही वाचा –
जसप्रीत बुमराह या अटीवरच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार, फिटनेस अपडेट जाणून घ्या
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक; सामन्याची वेळ, ठिकाण A टू Z जाणून घ्या
भारताचा स्टीव्ह स्मिथ? तरुण फलंदाजाने केली हुबेहूब नक्कल; व्हायरल VIDEO नक्की पाहा