यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर झाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला उपांत्य फेरीत देखील प्रवेश करता आला नाही. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर झाला होता. नेमकं काय कारण आहे की, भारतीय संघ मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरतोय? याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भाष्य केले आहे.
एका क्रीडा वहिनीशी चर्चा करताना सुनील गावसकर यांनी म्हटले की, “संघात खुप बदल करून काही एक होणार नाहीये. कारण, भारतीय संघ प्रत्येक सामन्यात पराभूत होणार नाहीये. त्या दोन सामन्यांमध्ये (पाकिस्तान आणि न्यूझीलंड) भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले होते. त्यांच्याकडून खूप आशा होत्या त्यामुळेच भारतीय संघ अडचणीत आला. त्यांनी खेळण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.”
पावरप्लेमध्ये भारतीय फलंदाज ठरले फ्लॉप..
तसेच सुनील गावसकर पुढे म्हणाले की, “सुरवातीच्या ६ षटकात फक्त २ क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर असतात. भारतीय संघाने गेल्या काही आयसीसीच्या स्पर्धांमध्ये याचा फायदा घेतला नाहीये. हेच मुख्य कारण आहे की, जेव्हा जेव्हा भारतीय संघ मोठ्या संघाविरुद्ध खेळतो, तेव्हा ते विरोधी संघातील गोलंदाजांवर आक्रमण करून मोठी धावसंख्या उभारू शकत नाहीत. या सर्व गोष्टींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. ”
“दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाला असे क्षेत्ररक्षण करावे लागेल जसे न्यूझीलंड संघाने केले. ते लोक धावांचा डोंगर उभारतात आणि अप्रतिम झेल देखील टिपतात. ज्यामुळे सामन्यात फरक पडत असतो. जर तुमच्याकडे चांगला गोलंदाज असेल पण खेळपट्टी साथ देत नसेल, तेव्हा तुमच्याकडे चांगले क्षेत्ररक्षक असतील तर फरक पडत असतो. भारतीय संघात तुम्ही पाहिलं तर ३-४ चांगले क्षेत्ररक्षक आहेत. परंतु, धावांचा बचाव करताना तुम्ही कोणा एकावर अवलंबून राहू शकत नाही.”