---Advertisement---

‘ …तर भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळू शकतो’, गावसकरांचा इशारा

On: मंगळवार, डिसेंबर 22, 2020 11:43 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. त्यातच भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ देखील खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे अंतिम ११ जणांच्या संघात कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डच्चू असा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनासमोर आहे. याबाबत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी एक सल्ला दिला आहे.

गावसकर एका युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हणाले, ‘भारत २ बदल करु शकतो. पहिला कदाचीत केएल राहुल, त्याने पृथ्वी शॉच्या जागेवर सलामीवीर म्हणून खेळावे. तसेच ५ व्या किंवा ६ व्या क्रमांकावर शुबमन गिलने खेळावे. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आपण चांगली सुरुवात केली तर गोष्टी बदलू शकतात.’

याबरोबरच ७१ वर्षीय गावसकर म्हणाले, ‘भारताला विश्वास ठेवावा लागेल की ते कसोटी मालिकेतील उर्वरित ३ सामन्यात पुनरागमन करतील. भारतीय संघ सकारात्मक राहिला नाही तर ४-० ने मालिका गमावू शकतो. पण जर त्यांच्यात सकारात्मक दृष्टीकोन असेल तर का नाही? पुनरागमन होऊ शकते.’

त्याचबरोबर गावसकर म्हणाले, ‘भारताला मेलबर्न कसोटीत चांगली सुरुवात करावी लागेल. त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की त्यांनी सकारात्मक रहावे. फलंदाजी ही ऑस्ट्रेलियाची कमजोरी आहे.’

या मालिकेतील ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारतीय संघांने अत्यंत खराब कामगिरी केली. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतलेला भारतीय संघ दुसऱ्या डावात पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडच्या गोलंदाजी आक्रमणापुढे ३६ धावांवर ढेपाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ९० धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान भारताकडून खराब प्रदर्शनही पाहायला मिळाले. यामुळे भारतीय संघावर अनेकांनी टीका केली.

याबाबत गावसकर म्हणाले, ‘पहिल्या कसोटीत भारताचा डाव ३६ धावांवर संपुष्टात आल्यानंतर चाहते नाराज होणे, हे स्वाभाविक आहे. जर आपण झेल पकडले असते आणि योग्य जागेवर क्षेत्ररक्षक असते तर कदाचित कोणतीही समस्या झाली नसती. टीम पेन आणि मार्नस लॅब्यूशेन लवकर बाद झाले असते.’

या कसोटी मालिकेतील उर्वरित ३ सामन्यांत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे नेतृत्वाची धूरा सांभाळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भल्या भल्यांना न जमणाऱ्या स्टाईलने करतो ‘हा’ खेळाडू फलंदाजी; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

कर्णधारपद नको रे बाबा…! पूर्णवेळ कसोटी कॅप्टन बनण्यास दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूचा नकार

द्रविड भारतीय फलंदाजांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? राजीव शुक्लांनी दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---