भारतीय संघाने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी२० सामना खेळला. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना कोलकाता येथे होणार आहे. रांची येथे झालेल्या टी२० सामन्यात आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणा-या हर्षल पटेलने पदार्पण केले. त्याला सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांनी भारतीय संघाची कॅप दिली. यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मोठे विधान केले आहे.
माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सामन्यातील समालोचना दरम्यान सुनील गावसकर म्हणाले, “राहुल द्रविडने पुन्हा एकदा ही पद्धत सुरू केली आहे. पूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटूच्या हस्ते पदार्पण करणाऱ्या खेळाडूला भारतीय संघाची कॅप दिली जात असे.”
गावसकर पुढे म्हणाले, “अनिल कुंबळेने ही प्रथा सुरू केली होती. जेव्हा-जेव्हा माजी खेळाडू मैदानावर उपस्थित असायचा तेव्हा तो त्या खेळाडूच्या हस्ते नवीन खेळाडूला कॅप द्यायचा. कोहली-शास्त्रींच्या काळात ही गोष्ट थांबली होती. मात्र, आता राहुल द्रविडने पुन्हा या गोष्टीची सुरुवात केली आहे.”
भारताने या मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले असून या दोन्ही सामन्यांमध्ये नवीन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. व्यंकटेश अय्यरने जयपूर टी२० मध्ये पदार्पण केले. तर, हर्षल पटेलने रांचीमध्ये पदार्पण केले. दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती.
रांची टी२० दरम्यान सुनील गावसकर यांनी आणखी एका मोठ्या गोष्टीवर भाष्य केले होते. या स्टेडियमला एमएस धोनीचे नाव द्यावे, असे ते म्हणाले. सध्या फक्त एका पॅव्हेलियनचे नाव एमएस धोनी पॅव्हेलियन असे आहे, तर स्टेडियमचे नाव झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आहे.
टी२० विश्वचषकानंतर लगेचच राहुल द्रविडने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. टी२० विश्वचषक हा रवी शास्त्रीसाठी शेवटची स्पर्धा ठरली होती. त्याचवेळी टी२० विश्वचषक हा विराट कोहलीचा टी२० कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा ठरली होती. आता रोहित शर्मा टी२० मध्ये भारतीय संघाचा कर्णधार असेल.