आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (३ मे) पहिला सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. हैद्राबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने प्रथम गोलंदाजी करताना त्यांना चांगलेच आव्हान दिले. त्यांच्या स्टार फिरकीपटूने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. सुनील नरेनने आयपीएलच्या इतिहासात २०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे.
नरेन आयपीएलमध्ये २०० विकेट्स घेणारा पहिलाच परदेशी गोलंदाज ठरला आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात २०० विकेट्सचा टप्पा गाठणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. त्याचबरोबर एकाच फ्रँचायझीसाठी ही कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज.
आयपीएलमध्ये २०० विकेट्स टप्पा युझवेंद्र चहल (२२८) आणि भुवनेश्वर कुमार (२१५) यांनीच गाठला. आता त्यांच्या या विशेष यादीत नरेन सामील झाला आहे. त्याने २५.५४ सरासरी असताना ही कामगिरी केली. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट ६.७९ राहिला.
नरेनने १६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलिल अरोराला बाद केले. टाकलेल्या त्या उत्तम कॅरम बॉलवर अरोराच्या बॅटची कड लागली आणि तो बॉल स्टम्पवर आदळला. अरोरा ६ चेंडूत २ धावा करत परतला. नरेनने त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इशान किशनचीही विकेट घेतली.
नरेन आयपीएलची सुरूवात २०१२ पासून केली असून तो पहिल्यापासूनच केकेआरकडून खेळत आहे. सध्याच्या हंगामात त्याने ६.७३ च्या इकॉनॉमी रटेने सात विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एसआरएचविरुद्ध ४ षटकात ३१ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याला बाकी गोलंदाजांनीही चांगली साथ दिल्याने एसआरएच पहिल्यांदा या हंगामात सर्वबाद झाला. केकेआरकडून सर्वाधिक विकेटस वरुण चक्रवर्तीने घेतल्या. त्याने ४ षटकात ३६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
एसआरएचने ट्रेविस हेडच्या ६१ धावा आणि इशानच्या ४२ धावांच्या जोरावर २० षटकात १० विकेट्स गमावत १६५ धावसंख्या उभारली. केकेआरची फलंदाजी सुरू असून त्यांनी १३ षटकांत १ विकेट गमावत १२२ धावा केल्या आहेत. फिन ऍलन २९ (१३) धावा करत बाद झाला.
सर्वाधिक विकेट्स (आयपीएल)
युझवेंद्र चहल – २२८*
भुवनेश्वर कुमार – २१५*
सुनील नरेन – २०१*
पियुष चावला – १९२
आर अश्विन – १८७
जसप्रीत बुमराह – १८६*
ड्वेन ब्रावो – १८३
रवींद्र जडेजा – १७७*
अमित मिश्रा – १७४
लसिथ मलिंगा – १७०






