वेस्ट इंडिजमधील त्रिनिदादमध्ये कॅरेबियन प्रिमियर लीगचा पहिला सामना शाहरुख खानचा त्रिनबॅगो नाईट रायडर्स व गयाना अमेझॉन वॉरियर्समध्ये खेळवला गेला. पावसाच्या व्यतयामुळे सामना १ तास उशीरा सुरु झाला आणि सामना प्रत्येकी १७ षटकांचा खेळवला गेला. त्रिनबॅगो संघाचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
पोलार्डचा निर्णय योग्य ठरला होता आणि गयानाने २३ धावांत बेंडन किंग व हेमराज चंद्रपॉलच्या रुपाने २ गडी गमावले होते. त्यानंतर हेटमायर व रॉस टेलरने डाव सावरत ५० धावा जोडल्या होत्या. रॉस टेलर (३३) व पुरन (१८) बाद झाल्यानंतरही हेटमायरने शानदार फटकेबाजी करत ४४ चेंडूत २ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ६३ धावांची शानदार खेळी करत संघाला १४४ धावांपर्यंत पोहचवले होते. टीकेआरकडून सुनील नारायणने गोलंदाजी करताना सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
१४५ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या टीकेआरने जोरदार सुरुवात केली होती.लेंडल सिमन्स बाद झाल्यानंतर सुनील नारायणने गयानाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत अर्धशतक झळकावले. सुनील सोबतच डॅरेन ब्राव्होने ३० धावांची खेळी केली आणि शेवटी टीकेआरने ४ गडी व २ चेंडू राखुन सत्रातला पहिला विजय नोंदवला. २८ चेंडूत २ चौकार व ४ षटकांरांसह तडाखेबाज ५० धावांची खेळी व गोलंदाजीत २ गडी बाद करणाऱ्या सुनिल नारायणला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.