दक्षिण आफ्रिकेतील टी-20 लीग (SA20) च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला असून, सर्व संघांचे स्क्वॉड निश्चित झाले आहेत. लिलावानंतर काव्या मारनच्या (Kavya Maran) मालकीच्या सनरायझर्स ईस्टर्न केप संघाने एक बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श (Mitchell Marsh) सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी तात्पुरता पर्याय म्हणून बेन डकेटचा (Ben Ducket) संघात समावेश करण्यात आला आहे.
सनरायझर्स ईस्टर्न केपने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शला आधीच करारबद्ध करून आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र, तो SA20 च्या आगामी हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे फ्रँचायझीने अधिकृत निवेदन जारी करत त्याच्या तात्पुरत्या पर्यायाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, मार्श दुखापतीमुळे या सामन्यांना मुकणार नाही.
सनरायझर्स ईस्टर्न केपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मिचेल मार्शच्या जागी बेन डकेट काही सामन्यांसाठी संघात सहभागी होईल.
सध्या मार्श ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये (Big Bash league) खेळण्यासाठी बांधील आहे. याबाबत फ्रँचायझीने पुढे स्पष्ट केले की, बिग बॅश लीगमधील त्याची जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर मार्श सनरायझर्स ईस्टर्न केप संघात दाखल होईल.
2027 मध्ये SA20 लीगचा पाचवा हंगाम खेळवला जाणार आहे. सनरायझर्स ईस्टर्न केप हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. आतापर्यंत झालेल्या चार हंगामांपैकी या संघाने तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2023 आणि 2024 मध्ये सलग दोन विजेतेपदे जिंकल्यानंतर संघाने 2026 मध्ये तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.
सनरायझर्स ईस्टर्न केपचा संपूर्ण संघ:- ट्रिस्टन स्टब्स (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिचेल मार्श (पर्यायी खेळाडू बेन डकेट, ॲडम मिल्ने, लुईस ग्रेगरी,क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), पॅट्रिक क्रूगर, क्रेग ओव्हर्टन, ॲन्रिक नॉर्खिया, सैनुरन मुथुसामी, लुथो सिपामला,मॅथ्यू ब्रीत्झके, नांद्रे बर्गर, मिशेल व्हॅन बुरेन, मार्को यान्सेन, रिशाद हुसेन, जॉर्डन हरमन






