आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (८ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात सामना पार पडला. मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर मोठे लक्ष्य ठेवले होते. परिणामी हैदराबाद संघ लक्ष्य गाठू शकला नाही आणि त्यांचा ४२ धावांनी पराभव झाला. सामन्यात हैदराबादचा नियमित कर्णधार केन विलियम्सन गैरहजर होता. विलियम्ससनच्या जागेवर मनीष पांडेने संघाचे नेतृत्व केले.
सामन्याच्या सुरुवातीला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक झाल्यानंतर मनीष पांडेने विलियम्सनच्या गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले आहे.
सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार विलियम्सनला सामन्यापूर्वी दुखापत झाली होती आणि याच कारणास्तव त्याला सामन्यात सहभागी होता आले नाही. नाणेफेक झाल्यानंतर या सामन्यात हैदराबादचे नेतृत्व करणाऱ्या मनीष पांडेने सांगितले की, “कर्णधाराच्या रूपात हा माझा पहिला अयपीएल सामना आहे. अंतिम क्षणी हा निर्णय घेतला गेला. केनच्या हाताच्या कोपऱ्याला वेदना होत आहेत. भुवनेश्वरही दुखापतीने ग्रस्त आहे. आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू इच्छित होतो. आता आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत आणि मुंबईला थोडा बदल देऊ इच्छितो. आम्हाला माहित आहे की, ते हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण ताकत लावतील, पण आम्हीही तयार आहोत.”
सनरायझर्सविरुद्धचा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्वाचा होता. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला हैदराबादवर १७१ धावांनी विजय मिळवणे आवश्वक होते, ज्याच्या जोरावर त्यांनी गुणतालिकेत कोलकाता नाइट रायडर्सला मागे टाकले असते. सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्याही गाठली, पण संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यामध्ये अपयशी ठरला आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करत मुंबईने २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर २३५ धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबईचा सलामीवीर ईशान किशनने तुफान फटकेबाजी केली. ईशानने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८४ धावा केल्या. याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८२ धावा केल्या. हैदराबादच्या जेसन होल्डरने या सामन्यात मुंबईचे चार विकेट्स घेतले.
मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा करू शकला. परिणामी मुंबईने सामन्यात विजय मिळवला. हैदराबादने केलेल्या धावांमध्ये कर्णधार मनीष पांडेने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. मुंबईच्या ईशान किशनला मॅन ऑफ द मॅच निवडले गेले.
महत्त्वाच्या बातम्या-
गाडी क्रमांक १५५२…! विजयानंतरही मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून ‘आऊट’, चाहत्यांकडून मीम्सचा वर्षाव
आयपीएल २०२१ला मिळाले टॉप-४ संघ, ‘असे’ होतील प्लेऑफ आणि फायनलचे सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक
टेबल टॉपर्सलाही चोपलं! दिल्लीविरुद्ध मॅक्सवेलचे झंझावाती अर्धशतक, मोठ्या विक्रमांची खात्यात भर