सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. पण शेवटी त्यांना या स्पर्धेत आपला दुसरा विजय नोंदवता आला आहे. सोमवारी (२७ सप्टेंबर) त्यांनी राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला आणि १० सामन्यांमध्ये आपला दुसरा विजय नोंदविला. यासह हैदराबाद संघाचे चार गुण झाले आहेत. याशिवाय ते गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहेत. दरम्यान या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरला न खेळवल्याने बरीच चर्चा झाली. याबाबत आता संघ प्रशिक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सनरायझर्स हैदराबादचा संघ ४ बदलांसह या सामन्यात उतरला होता. डेविड वॉर्नर, मनीष पांडे आणि केदार जाधव यांना त्यांच्या खराब फॉर्ममुळे वगळण्यात आले होते. तर खलील अहमद दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. डेविड वॉर्नर बाहेर बसल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. यावर संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलीस म्हणाले की, संघ व्यवस्थापनाने तरुणांना संधी देण्यासाठी खराब फॉर्मशी झगडणाऱ्या वॉर्नरला सामन्यात न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
वॉर्नरच्या जागी सनरायझर्सने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला संधी दिली होती. या आक्रमक फलंदाजाने सनरायझर्सकडून खेळलेल्या आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. रॉय व्यतिरिक्त कर्णधार केन विल्यमसननेही अर्धशतक केले.
बेलीस सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘जर आम्ही पुढच्या फेरीत जाऊ शकत नसलो, तर आम्ही तरुणांना संधी दिली पाहिजे जेणेकरून त्यांना अनुभव मिळेल, असे आम्ही ठरवले होते. संघात अनेक युवा खेळाडू आहेत, जे अजून आयपीएलचे सामने खेळलेले नाहीत. त्यांना संधी देण्याची अधिक गरज आहे. येत्या सामन्यांमध्येही हा विचार कायम राहील.’
हैदराबादचे प्रशिक्षक म्हणाले, ‘वॉर्नरने हॉटेलमधून सामना पाहिला आणि संघाला पाठिंबा दिला. आम्ही सर्व एकत्र आहोत.’ वॉर्नरचे सनरायझर्ससोबतचे दिवस संपले का?, असे विचारल्यावर बेलीस म्हणाले, ‘याबद्दल अजून काहीही विचार झालेला नाही. वॉर्नरने इतकी वर्षे संघाला खूप काही दिले आहे आणि प्रत्येकजण त्याचा खूप आदर करतो. मला खात्री आहे की, तो आयपीएलमध्ये अधिक धावा करेल.’ सनरायझर्सचा सामना आता ३० सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जशी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीसंत म्हणाला, ‘त्यावेळी २ लाखांची साधी पार्टी करायचो, मग मी १० लाखांसाठी स्पॉट फिक्सिंग का करू?’
‘सगळी हॉटनेस एकाच संघात भरलीय’, कोहलीच्या शर्टलेस फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ; तुम्हीही पाहा
आधीच संधी मिळत नसलेल्या कुलदीपच्या वाढल्या अडचणी, आयपीएलसह ‘या’ स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता