दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीग SA20 मध्ये खेळणाऱ्या जोबर्ग सुपर किंग्सने आपल्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. गुरुवारी (30 जुलै) घोषणा करताना फ्रेंचायझीने सांगितले की, आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एल्बी मोर्कल याच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोर्कलने स्टीफन फ्लेमिंग यांची जागा घेतली आहे.
फ्लेमिंग यांनी स्पर्धेच्या पहिल्या 4 मोसमांमध्ये मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आपले पद सोडले होते. आता आगामी मोसमात मोर्कल या टीमसोबत दिसणार आहे. विशेष म्हणजे, मोर्कल SA20 च्या पहिल्या मोसमापासूनच जोबर्ग सुपर किंग्स फ्रेंचायझीशी जोडलेला आहे.
एल्बी मोर्कलला मुख्य प्रशिक्षक बनवल्याची घोषणा करताना फ्रेंचायझीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “अधिकृत घोषणा. जोबर्ग सुपर किंग्सने एल्बी मोर्कलला टीमचे मुख्य प्रशिक्षक बनवण्याची घोषणा केली आहे.”
पुढे लिहिले आहे, “सुपर किंग्स कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य म्हणून, एल्बी आपल्यासोबत दांडगा अनुभव आणि टीमच्या संस्कृतीची (Culture) उत्तम समज घेऊन येत आहे. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालील या नवीन आणि रोमांचक अध्यायाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.”
एल्बी मोर्कलच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास, तो आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेला खेळाडू आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 1 कसोटी (Test), 58 एकदिवसीय (ODI) आणि 50 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आपल्या एकमेव कसोटी सामन्यात त्याने 1 विकेट घेतली आणि 58 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांच्या 52 डावांमध्ये मोर्कलने 50 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीत २ अर्धशतकांसह 782 धावा केल्या. तर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 46 डावांमध्ये त्याने 26 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीत 572 धावा केल्या.
याशिवाय तो आयपीएलमध्ये अनेक वर्षे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. याव्यतिरिक्त तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सचाही भाग राहिला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत एकूण 91 सामने खेळले, ज्यातील 87 डावांमध्ये 85 विकेट्स घेतल्या आणि 68 डावांमध्ये 974 धावा केल्या.






