इंग्लंडचा भारत दौरा आता अंतिम चरणात आला आहे. भारत आणि इंग्लंड संघांनी कसोटी आणि टी२० मालिका पूर्ण केल्या असून उभय संघ वनडे मालिकेच्या तयारीला लागले आहेत. मंगळवार रोजी (२३ मार्च) वनडे मालिकेतील पहिला सामना पुणे येथे खेळवला जाणार आहे. ही मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा (world cup super league) भाग असेल. अशात या मालिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलचे (आयसीसी) नवे नियम लागू होतील.
भारतीय संघाला टॉप-३ मध्ये जागा मिळवण्याची संधी
आयसीसीने जुलै २०२० मध्ये वर्ल्डकप सुपर लीगची सुरुवात केली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १३ संघांना सहभागी करण्यात आले आहेत. या लीग अंतर्गत प्रत्येक संघ ३ सामन्यांच्या ८ वनडे मालिका खेळणार आहे. अर्थात एका संघाला तब्बल २४ वनडे सामने खेळावे लागणार आहेत. त्यापैकी ४ मालिका घरच्या तर ४ मालिका बाहेरील मैदानावर होतील. यातील प्रत्येक सामना विजयासह संघाच्या खात्यात १० गुण जमा होतील.
भारतीय संघाने वर्ल्डकप सुपर लीगच्या अंतर्गत आतापर्यंत फक्त १ वनडे मालिका खेळली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गतवर्षी झालेल्या या मालिकेत भारताला १-२ ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर इंग्लंडविरुद्ध भारताची ही दुसरी वनडे मालिका असेल. वर्ल्डकप सुपर लीगच्या शेवटी टॉप-८ मध्ये असलेले संघ विश्वचषक २०२३ मध्ये थेट प्रवेश करतील. इतर ५ संघांना क्वालिफिकेशन टूर्नामेंट खेळावी लागेल.
वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणपत्रिकाबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलिया संघ सर्वाधिक ४० गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. बांगलादेश, इंग्लंड, अफगानिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्या खात्यात प्रत्येकी ३०-३० गुण जमा आहेत. मात्र रन रेटच्या आधारावर बांगलादेश दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या, अफगानिस्तान चौथ्या आणि वेस्ट इंडिज पाचव्या स्थानावर आहे.
भारतीय संघ ९ गुणांसह दहाव्या स्थानी आहे. जर भारताने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका ३-० ने जिंकली तर त्यांच्या नावे ३९ गुण होतील. अशात भारतीय संघ थेट दहाव्या स्थानावरुन टॉप-३ मध्ये उडी घेऊ शकतो.
भारत-इंग्लंड वनडे मालिकेत दिसणार सुपर ओव्हरचा थरार
तसे तर, द्विपक्षीय वनडे मालिकेत सामना बरोबरीत सुटल्यास सहसा सुपर ओव्हर खेळवली जात नाही. मात्र भारत-इंग्लंड वनडे मालिका आयसीसीच्या वर्ल्डकप सुपर लीगचा भाग असल्याने सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळू शकतो. अशात जर भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळली जाईल. जर पहिली सुपर ओव्हरही बरोबरीवर राहिली तर अंतिम निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर घेतली जाईल.
असा झाला या नियमाचा आरंभ
साल २०१९ मध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्या झालेला वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. परंतु सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्याने आयसीसीच्या बाउंड्री काउंट नियमानुसार इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते. यानंतर आयसीसीच्या या नियमावर क्रिकेट पंडितांनी टिका केली होती. त्यामुळे आयसीसीने जोवर कोणता संघ सामना जिंकत नाही तोवर सुपर ओव्हर खेळवण्याचा नवा नियम आणला.
महत्त्वाच्या बातम्या-
मिस्टर ॲन्ड मिसेस चहल, टीम इंडियातील ‘प्रसिद्ध’ जोडप्याचे पुण्यात आगमन; व्हिडिओ व्हायरल
कृणाल पंड्याचे पदार्पण, तर मार्क वुडचे पुनरागमन; ‘असा’ असेल पहिल्या वनडेसाठी भारत-इंग्लंड संघ
“माझ्या भावामुळे…,” अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या युसूफने व्यक्त केल्या भावना