चेन्नई। आयपीएल 2019 मध्ये बुधवारी(1 मे) एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 50 वा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 80 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाकडून 22 चेंडूत 44 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच यष्टीरक्षणातही चांगली कामगिरी करताना 2 यष्टीचीत केले आणि 1 झेल घेतला.
धोनीची कर्णधार आणि खेळाडू म्हणून केलेली कामगिरी चेन्नईसाठी त्यांनी खेळलेल्या दहाही मोसमात महत्त्वाची ठरली आहे. पण आता धोनीच्या वाढत्या वयाचा विचार करता तो लवकरच निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
तसेच त्याला फिटनेसच्याही समस्या जाणवू लागल्या आहेत. या आयपीएल मोसमात धोनी सनरायझर्स हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या या दोन सामन्यांना फिटनेसच्या कारणामुळे मुकला होता.
त्याच्या अनुपस्थितीत सुरेश रैनाने चेन्नईचे प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते. पण चेन्नईला या दोन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर बुधवारी पुन्हा धोनी मैदानावर परतल्यावर चेन्नईचा संघही विजयी पथावर परतला.
बुधवारी झालेल्या सामन्यानंतर रैनाने धोनीचे कौतुक करताना पुढील वर्षी तो चेन्नईचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचे सुचित केले आहे.
रैना म्हणाला, ‘मला वाटते की कर्णधार म्हणून धोनी नसण्यापेक्षा तो फलंदाज म्हणून नसणे आमच्यासाठी कठीण होते. आमच्याबरोबर हैद्राबाद आणि मुंबईविरुद्ध असेच झाले. जेव्हा तो मैदानात येतो, तेव्हा समोरच्या संघावर खूप दबाव येतो. पण जेव्हा तो संघात नसतो. तेव्हा आपण फरक पाहिला.’
तसेच रैनाने पुढील वर्षी चेन्नईचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचे सुचित करताना म्हटले की ‘त्याने(धोनीने) मागील अनेक वर्षात फलंदाज म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे कदाचित तूम्ही मला पुढील वर्षी जेव्हा तो थांबेल तेव्हा जास्त सामन्यात नेतृत्व करताना पहाल. पण मला त्याच्या क्षमतेची गरज आहे. पण त्याला पाहिजे तोपर्यंत चेन्नईसाठी तो खेळू शकतो. तूम्ही त्याला आणि चेन्नईला ओळखता.’
याबरोबरच रैनाने धोनीच्या यष्टीरक्षण कौशल्याचे कौतुक केले आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात रैनानेही अर्धशतकी खेळी करताना 37 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार मारत 59 धावा केल्या. हे रैनाचे आयपीएलमधील 37 वे अर्धशतक ठरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, रबाडाला परतावे लागणार मायदेशी; जाणून घ्या कारण
–आयपीएलमध्ये ‘नो बॉल’ वादात चर्चेत आलेल्या या भारतीय पंचांना आयसीसीकडून मोठा धक्का
–धोनीने मारला एका हाताने षटकार, गोलंदाजाने बिमर टाकल्याने मागितली माफी, पहा व्हिडिओ