मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. मार्च २०१२ मध्ये बांग्लादेशविरुद्ध वनडे सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १००वे शतक ठोकले होते. सचिनच्या या ऐतिहासिक क्षणावेळी नॉन स्ट्राईकर बाजूला माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना उपस्थित होता. आता रैनाने त्या अविस्मरणीय क्षणावेळी सचिनची प्रतिक्रिया काय होती, याचा खुलासा केला आहे.
क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना रैना म्हणाला की, “सचिनने बांग्लादेशचा गोलंदाज शाकिब अल हसनच्या चेंडूवर एक धाव घेत १००वे शतक पूर्ण केले होते. त्यावेळी मी त्याला शुभेच्छा देत म्हणालो की, खूप छान पाजी, गेल्या कित्येक महिन्यांपासून तुमचे १००वे शतक अडकून होते. यावर बोलताना सचिन म्हणाला की, या क्षणाची प्रतिक्षा करता-करता माझे केस पांढरे झाले आहेत. त्यावेळी मला जाणीव झाली की, त्या काळात सचिनवर किती मानसिक दबाव होता.”
सचिन-रैनामध्ये झाली होती ८६ धावांची भागिदारी
मार्च १६, २०१२ रोजी ढाका येथे आशिया चषकातील चौथ्या सामन्यात सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० वे शतक ठोकले होते. यावेळी दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १४७ चेंडूत ११४ धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने १२ चौकार आणि एक षटकार लगावला होता. तसेच माजी डावखुरा फलंदाज रैनानेही ३८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या होत्या. सोबतच सचिन आणि रैनामध्ये ८६ धावांची भागिदारी झाली होती.
सचिन तेंडूलकरची क्रिकेट कारकिर्द
सचिन तेंडूलकरच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके आणि वनडेत ४९ शतके असे एकूण १०० शतके केली आहेत. १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सचिनने २०० कसोटी सामने खेळले होते. यात त्याने नाबाद २४८ धावा या सर्वोच्च वैयक्तिक खेळीसह १५९२१ धावा केल्या होत्या.
तर वनडे क्रिकेटमध्ये ४६३ सामन्यात १८४२६ धावा केल्या होत्या. मात्र सचिनची टी२० कारकिर्द विशेष राहिली नाही. त्याने टी२० क्रिकेटमध्ये केवळ १ सामना खेळत १० धावा केल्या होत्या.
कुठे व केव्हा होणार भारत-ऑस्ट्रलिया तिसरा कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
काय सांगता! आयपीएलमधून माघार घेतलेला डेल स्टेन खेळणार ‘या’ टी२० टूर्नामेंटमध्ये