खेळ कोणताही असो, त्यातील खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती नसेल तर तो खेळ प्रेक्षकांना रुचत नाही. फुटबॉल आक्रमक खेळ असला तरीही प्रत्येक खेळाडू तो जितका खेळता येईल तितका सभ्यपणे खेळताना दिसून येतात. क्रिकेटला तर ‘जंटलमन्स गेम’ असे म्हटले जाते. जगभरातील काही मोजकेच देश क्रिकेट खेळत आहेत. असे असले तरीही त्या देशांमध्ये क्रिकेटची अफाट लोकप्रियता आहे.
सन 1987 चा विश्वचषक आणि यजमान भारत
क्रिकेट हा खेळ लोकांच्या काळजाजवळ जाण्यामागे खेळाडूंची खिलाडूवृत्तीही तितकीच महत्त्वपूर्ण ठरली. आज अशाच, क्रिकेटच्या मैदानावर घडलेल्या एका असामान्य घटनेविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या घटनेत खिलाडीवृत्ती दाखवणारा खेळाडू, दुसरा तिसरा कोणीही नसून भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) हेच आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त (6 जानेवारी) आज आपण त्यांनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल जाणून घेऊ.
सन 1987 साली प्रथमच इंग्लंडबाहेर विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यावेळी स्पर्धेचे यजमानपद भूषवत होते. भारतीय उपखंडात क्रिकेटला कमालीची लोकप्रियता लाभली होती. याचा फायदा उचलण्यासाठी जगमोहन दालमिया आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा आयोजित करण्याचे शिवधनुष्य पेलले होते. भारत स्पर्धेत गतविजेता म्हणून सहभागी होत होता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील थरारक सामना
स्पर्धेतील तिसरा सामना गतविजेता यजमान भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळवला जाणार होता. 9 ऑक्टोबर रोजी, नियोजित या सामन्यात भारतीय कर्णधार कपिल देव यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर डेविड बून व ज्योफ मार्श यांनी कपिल देव यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेणे सुरु केले. संघाच्या 110 धावा झालेल्या असताना बून वैयक्तिक 49 धावांवर बाद झाले.
बून परतल्यानंतर मैदानावर डीन जोन्स यांचे आगमन झाले. जोन्स यांनी अगदी एका वर्षापूर्वी याच चेन्नईच्या मैदानावर कसोटीत ऐतिहासिक द्विशतकी खेळी साकारली होती. जोन्स यांनी पुन्हा एकदा आपल्या सुंदर फलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात केली. फिरकी गोलंदाजांना ते पुढे सरसावत फटके मारत होते. याचवेळी, दुसरे सलामीवीर मार्श यांनी आपले शतक साजरे केले.
‘तो’ चेंडू ज्यामुळे सामन्याचं सर्व चित्र पालटलं
जोन्स हेदेखील फॉर्म आले होते. त्यांनी मनिंदरसिंग यांचा एक चेंडू लॉंग ऑनला काहीसा हवेतून टोलवला. हा झेल होईल असे वाटत असताना, त्यावेळचे भारतीय संघातील सर्वात उंच खेळाडू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना तो उंचावरून आलेला चेंडू झेलण्यात अपयश आले आणि चेंडू खाली पडला. ही घटना अगदी सीमारेषेच्या जवळ झाली असल्याने तो षटकार आहे की चौकार हे पंच डिकी बर्ड यांना ठरवता येत नव्हते.
त्यांनी रवी शास्त्री यांना चौकार की षटकार असे विचारले असता, त्यांनी चौकाराचा इशारा केला. बर्ड यांनीदेखील चौकाराचा निर्णय दिला. इकडे फलंदाज डीन जोन्स यांचे म्हणणे होते की, हा षटकार आहे. भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे यांनी जोन्स यांना, हा चौकारच आहे. तुला का षटकार वाटतोय? असे विचारले.
जोन्स यांनी पंच बर्ड यांना पुन्हा एकदा हा चौकार नसून षटकार आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बर्ड यांनी, हा डाव संपल्यानंतर याविषयी चर्चा करू असे उत्तर दिले. उर्वरित षटकांचा खेळ यानंतर सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने आपल्या 50 षटकात 268 धावा धावफलकावर लावल्या.
अधिक वाचा – ‘कपिल देव यांची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करण्यासाठी ६ महिने करावा लागला ४ तास सराव’
खिलाडू वृत्ती म्हणून कपिल देव यांच्या निर्णयाला सलाम
पहिला डाव संपल्यानंतर, विश्रांतीदरम्यान ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापक अॅलन क्रॉम्प्टन यांनी आपण ‘त्या’ चौकाराच्या निर्णयाशी सहमत नसल्याचे सांगितले. क्रॉम्प्टन, पंच बर्ड आणि डेविड आर्चर यांच्यात काही वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर हे तिघेही भारतीय कर्णधार कपिल देव यांच्याकडे गेले. कपिल देव यांनी खेळभावनेचे असामान्य प्रात्यक्षिक दाखवत, त्या चौकाराला षटकार म्हणण्यास अनुमती दिली.
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 268 वरून 270 झाली होती व भारताला जिंकण्यासाठी 271 धावांचे नवीन आव्हान मिळाले होते. भारतीय सलामीवीर सुनील गावसकर आणि कृष्णम्माचारी श्रीकांत या अनुभवी सलामीवीरांनी 69 धावांची सलामी दिली. गावसकर बाद झाल्यानंतर, युवा नवज्योतसिंह सिद्धू यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचे धोरण स्वीकारले. धावफलकावर 131 धावा लागल्या असताना श्रीकांत वैयक्तिक 70 धावांवर स्टीव वॉच्या गोलंदाजीवर बाद झाला. सिद्धू 73 धावांवर बाद झाले तेव्हा, भारताची धावसंख्या होती, 207-3. सामन्यात भारताचे पारडे जड होते. पण अझरुद्दीन, शास्त्री, कपिल देव हे सर्व भरवशाचे फलंदाज नियमित अंतराने तंबूत परतले. सामना अचानक ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला.
व्हिडिओ पाहा – डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत
…आणि सभ्य लोकांचा खेळ क्रिकेटमधील जेंटलमॅन बनले ‘कपिल देव’
49 व्या षटकात, ऍलन बॉर्डर यांच्या अचूक फेकीवर अष्टपैलू मनोज प्रभाकर बाद झाला आणि सामन्यातील रंगत अजून वाढली. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी सहा धावांची आवश्यकता होती. किरण मोरे व मनिंदर सिंह ही अखेरची जोडी मैदानात उरलेली. स्ट्राइकला असलेल्या मनिंदर सिंह यांनी स्टीव वॉच्या पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर प्रत्येकी दोन धावा काढत भारताला विजयाच्या समीप आणले. भारताला विजयासाठी दोन चेंडूत दोन धावांची गरज होती. वॉने टाकलेला पाचवा चेंडू फटकावायच्या नादात हुकला आणि त्या चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. भारताचा डाव 269 धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने अवघ्या एका धावेने विजय संपादन केला.
कपिल देव यांनी खिलाडूवृत्तीने ऑस्ट्रेलियाला बहाल केलेल्या ‘त्या’ दोन धावाच विजय आणि पराभवातील अंतर ठरल्या. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला तरीही, जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने मात्र कपिल देव यांनीच जिंकली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५- लढवय्या साईराज बहुतुले!
…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल