मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम स्थगित करावा लागला होता. त्यानंतर आता हा उर्वरित हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत होणार आहे. हा हंगाम भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहे. याचबाबतीत सुरेश रैनाने मोठे भाष्य केले आहे.
रैना आणि धोनी हे दोघेही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून एकत्र खेळतात. त्यामुळे त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मैदानाबाहेरही चांगली मैत्री आहे. अनेक घटनांमधून त्यांच्यातील मैत्री खूप घट्ट असल्याचेही दिसून आले आहे. आता रैनाने म्हटले आहे की जर धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली तर तो देखील आयपीएलमधून निवृत्त होईल.
रैनाने न्यूज २४ स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तो धोनीला आणखी एखादा हंगाम खेळण्यासाठी मनधरणी करेल, पण जर धोनीने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, तर तोही त्याच मार्गाने जाईल.
रैना म्हणाला, ‘माझ्यामध्ये आणखी ४-५ वर्षांचे क्रिकेट बाकी आहे. यावर्षी आयपीएल होणार आहे आणि त्यानंतर पुढीलवर्षी २ नवे संघ सामील होतील. पण मला असे वाटते की मी जोपर्यंत खेळत आहे, तोपर्यंत मी सीएसकेकडूनच खेळेल. मला आशा आहे की आम्ही यावर्षी चांगली कामगिरी करु.’
‘मिस्टर आयपीएल’ अशी ओळख मिळवलेला रैना पुढे म्हणाला, ‘जर धोनी भाई पुढील आयपीएल हंगाम खेळला नाही, तर मी सुद्धा खेळणार नाही. आम्ही २००८ सालापासून आयपीएल एकत्र खेळत आहोत. तरी, जर आम्ही यावर्षी जिंकलो, तर मी त्याला पुढील वर्षीही खेळण्यासाठी मनधरणी करेल. कारण यावर्षाच्या आयपीएलनंतर पुढील हंगामासाठी केवळ ३-४ महिने शिल्लक असतील. मी माझे सर्वोत्तम देईल. पण, जर तो खेळणार नसेल तर मला वाटत नाही की मी देखील कोणत्याही आयपीएल संघासाठी खेळेल.’
आयपीएल २०२१ हंगामानंतर पुढील वर्षीच्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. तसेच पुढील वर्षापासून ८ ऐवजी १० संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२२ हंगामासाठी प्रत्येक संघाला लिलावापूर्वी केवळ ४ खेळाडू संघात कायम करण्याची परवानगी आहे.
धोनी-रैनामध्ये खास मैत्री
धोनी आणि रैना केवळ आयपीएलमध्ये सीएसकेकडूनच नाही, तर भारतीय संघाकडूनही एकत्र खेळले आहेत. त्यांच्यातील घट्ट मैत्रीची दर्शन सर्वांना तेव्हा झाले जेव्हा धोनीने मागीलवर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा त्याच्या पाठोपाठ काही तासांच्या अंतरानेच रैनानेही निवृत्ती घोषित केली होती.
धोनी आणखी १-२ वर्षे खेळणार – कासी विश्वनाथन
आयपीएल २०२१ हा धोनीचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा जरी सध्या होत असली, तरी काही दिवसांपूर्वीच सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी म्हटले होते की धोनी आणखी एक ते दोन वर्षे आयपीएलमध्ये खेळू शकतो. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून सराव करत असतो.
महत्त्वाच्या बातम्या –
“राहुल द्रविडने भारताचा पूर्णवेळ प्रशिक्षक होऊ नये”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचे मत
भारताची आक्रमक फलंदाज शेफाली वर्मा झाली १० वी पास, पाहा किती मिळालेत गुण
टी२० च्या जमान्यात ५७ वर्षापासून अबाधित आहे ‘हा’ विश्वविक्रम, सेहवाग पोहोचला होता सर्वात जवळ