भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. रैनाने आपला शेवटचा वनडे सामना इंग्लंडविरुद्ध २०१८ मध्ये खेळला होता. त्याने माजी कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लगेचच तासाभरात आपल्या निवृत्तीची माहिती दिली होती.
सुरेश रैनाने २२६ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी ५ शतकांसह ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या. त्याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये सुरेश रैनाला जास्त संधी मिळाली नाही. त्याने १८ कसोटी सामन्यात एका शतकासह ७८६ धावा केल्या. टी-२० मध्ये रैनाने ७८ सामन्यांत १६०५ धावा केल्या आणि एक शतकही ठोकले.
आयपीएलमध्ये रैनाचे ५००० हून अधिक धावा आहेत. अशा चमकदार कारकीर्दीत रैनाच्या नावे काही विक्रमही नोंदविण्यात आले. या लेखात रैनाच्या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलच्या ५ विक्रमांविषयी जाणून घेऊया.
क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक झळकावणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय खेळाडू आहे. वनडे क्रिकेटमधील पहिले शतक सुरेश रैनाने २५ जून २००८ मध्ये कराची येथे हाँगकाँगविरुद्ध केले होते. त्याने केलेल्या १०१ धावांच्या या अप्रतिम खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार ठोकले होते. हा सामना भारतीय संघाने २५६ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ मे २०१० रोजी टी-२० मध्ये शतक झळकावले. रैनाने ६० चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. हा सामना भारताने १४ धावांनी जिंकला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला होता, तर असे करणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सुरेश रैनाने २६ जुलै २०१० मध्ये कोलंबो येथे श्रीलंकेविरूद्ध पदार्पण केले होते आणि पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने १२० खेळी केली ज्यामध्ये १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. हा सामना अनिर्णित होता. त्यावेळी तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला.
टी-२० विश्वचषक आणि वनडे विश्वचषकात शतक झळकावणारा एकमेव भारतीय खेळाडू
टी-२० विश्वचषक आणि वनडे विश्वचषकात शतक झळकावण्याची कामगिरी भारताचा एकमेव फलंदाज सुरेश रैनाने केली आहे. रैनानंतर आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाने ही आश्चर्यकारक कामगिरी केलेली नाही.
रैनाने २०१५ च्या विश्वचषकात १४ मार्चला वनडे कारकिर्दीतील शेवटचे आणि पाचवे शतक झळकावले. ऑकलंडमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात रैनाने ११० धावा केल्या. हा सामना भारताने ६ गडी राखून जिंकला.
सुरेश रैनाने २ मे २०१० रोजी टी-२० क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शतक ठोकले होते. रैनाने ६० चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या होत्या. हे त्याचे पहिले आणि एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० शतक आहे. हा सामना भारताने १४ धावांनी जिंकला.
कसोटी पदार्पण सामन्यातच शतक
सुरेश रैनाने कसोटीमध्ये पदार्पण सामन्यातच शतक झळकावले होते आणि कसोटीत पदार्पण सामन्यात शतक ठोकणारा तो भारताचा १२ वा खेळाडू ठरला. रैनाने आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरूवात चांगली केली, पण तो भारताकडून जास्त कसोटी सामने खेळला नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये सुरेश रैनाने २६ जुलै २०१० रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरूद्ध पदार्पण केले होते आणि पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने १२० धावा फटकावल्या ज्यामध्ये १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. हा सामना फक्त सुरेश रैनाच्या खेळीमुळे अनिर्णित राहिला.
चौकार न ठोकता सर्वाधिक ५ षटकार
रैना जगातील टॉप-५ आणि भारतातील पहिला भारतीय फलंदाज आहे, ज्यानी एका वनडेत एकही चौकार न मारता ५ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत. २००९मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात एकही चौकार न मारता रैनाने ५ षटकार मारत हा पराक्रम केला होता.
आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात युवा भारतीय कर्णधार –
१२ जून २०१० ला जेव्हा रैनाने झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे टी२० सामन्यामध्ये नेतृत्व केले होते तेव्हा तो भारताचा सर्वात युवा टी२० कर्णधार ठरला होता. त्यावेळी त्याचे वय २३ वर्षे १९७ दिवस इतके होते. तो सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला होता.