श्रीलंका दौरा आटोपून इंग्लंडला गेलेले भारतीय युवा शिलेदार, सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ सध्या विलगीकरणात आहेत. इंग्लंड दौऱ्यावरील ३ भारतीय खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर झाले होते. त्यामुळे त्यांच्याजागी या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र कोविड-१९ प्रोटोकॉलमुळे त्यांना विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय संघासोबत सहभागी होता येणार नाही. मात्र हे खेळाडू विलगीकरणात असूनही मजा-मस्ती करताना दिसत आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
विस्फोटक फलंदाज सूर्यकुमारने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत युवा सलामीवीर शॉ सुद्धा दिसत आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू कोणत्याही क्रिकेटशी संबंधित विषयावर चर्चा न करता चक्क हिंदी सिनेमातील डायलॉग बोलताना दिसत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आमिर खान आणि सलमान खान यांच्या अंदाज अपना अपना या सिनेमातील हे डायलॉग आहेत. कुतुहलाची बाब म्हणजे, हे दोन्ही क्रिकेटपटू अगदी एखाद्या पारंगत अभिनेत्याप्रमाणे अभिनय करताना दिसत आहेत.
सूर्यकुमारने हा व्हिडिओ पोस्ट करत त्यावर भन्नाट असे कॅप्शनही दिले आहे. ‘सर, तुम्ही केवळ पुरुष नाहीत. तर तुम्ही महापुरुष आहात,’ असे सूर्यकुमारने लिहिले आहे. त्याने हे कॅप्शन अजून कोणासाठी नव्हे तर, अभिनयात आपल्याला साथ देणाऱ्या शॉसाठी लिहिले आहे.
मुंबईकरांच्या या जुगलबंदीचा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांचा घाम काढणाऱ्या सूर्यकुमार आणि शॉला अभिनय करताना पाहून अनेकांना हसू फुटले आहे. तर काहींनी त्यांच्या अभिनयाची स्तुतीही केली आहे.
https://www.instagram.com/reel/CSb6aS9oOVS/?utm_source=ig_web_button_share_sheet
तिसऱ्या कसोटीत मिळू शकते सूर्यकुमार आणि शॉला संधी
विलगीकरणामुळे सूर्यकुमार आणि शॉ इंग्लंडमध्ये असूनही पहिल्या २ कसोटी सामन्यांना मुकले आहेत. मात्र त्यांना येत्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यांची खेळण्याची दाट शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होईल. तसेच त्यांना सरावासठीही वेळ मिळेल. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा विचार करेल. मात्र या खेळाडूंसाठी कोणाला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळेल? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.