सूर्यकुमार यादवला भारतीय टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून तो टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसेल.
नियमित कर्णधार रोहित शर्मानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवडकर्त्यांना टी20 साठी नवीन कर्णधाराची निवड करावी लागली. हार्दिक पांड्या या शर्यतीत पुढे होता, मात्र मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पहिली पसंती सूर्यकुमार यादवला होती. या मागचं कारण हार्दिक पांड्याची फिटनेस हे आहे.
मात्र एक अहवाल समोर आला, ज्यात म्हटलं आहे की, कर्णधार म्हणून भारतीय ड्रेसिंग रुमची पसंती सूर्यकुमार यादवला होती. सूर्यानं नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत संघाचं नेतृत्व केलं होतं. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की एक वेळ अशी होती, जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारींनंतर सूर्यकुमार यादवला कर्णधारपद सोडावं लागलं होतं!
सूर्यकुमार यादवकडे कर्णधार म्हणून फारसा अनुभव नाही. त्यानं 24 टी20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्यापैकी 16 सामने जिंकले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय टी20, आयपीएल आणि देशांतर्गत टी20 सामन्यांचा समावेश आहे. पण 2014 साली पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघाचा कर्णधार बनवल्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती. झहीर खान आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत सूर्या कर्णधार झाला होता. त्यावेळी संघात सध्याचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचाही समावेश होता. सूर्याला 2014/15 रणजी हंगामात मुंबईचा कर्णधार बनवण्यात आलं होतं.
विस्डेनच्या रिपोर्टनुसार, मुंबईच्या खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. संघानं 6 पैकी केवळ 1 सामना जिंकला. 9 संघांच्या गुणतालिकेत संघ सहाव्या स्थानावर होता. तामिळनाडूविरुद्ध मुंबईला डावानं पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर सूर्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
विशेष म्हणजे, कर्णधार म्हणून मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये अपशब्द वापरल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशननं सूर्याला फटकारलं होतं. त्याच्याविरोधात खेळाडूंनीही तक्रार केली होती. मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यादरम्यान सूर्यात आणि शार्दुल ठाकूरमध्ये जाहीर बाचाबाची झाली होती, ज्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण आणखीनच चिघळू शकत होतं. मुंबईचे व्यवस्थापक श्रीकांत टिग्री यांनी शिस्तभंगाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा अहवाल एमसीएला सादर केला होता, ज्यामुळे सूर्यानं राजीनामा दिला होता.
हेही वाचा –
आयसीसी रँकिंगमध्ये रोहित शर्माची घसरण, इंग्लंडच्या फलंदाजानं मिळवलं टॉप 5 मध्ये स्थान
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची हकालपट्टी, आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्जमध्ये होणार मोठा बदल!
श्रीलंका मालिकेपूर्वी संघाला धक्का, स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर