सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये अजिंक्य रहाणेचा किलर फॉर्म कायम आहे, उपांत्य फेरीच्या सामन्यात रहाणेनं बडोद्याविरुद्ध 98 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रहाणेला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज आणि भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानं मोठं मन दाखवलं, ज्याचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.
वास्तविक झालं असं की, रहाणे 94 धावांवर खेळत असताना मुंबईला विजयासाठी सहा धावांची गरज होती आणि सूर्यकुमार यादव नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता. रहाणेनं स्वीपर कव्हर एरियात अभिमन्यू सिंगचा चेंडू खेळला. या चेंडूवर रहाणेला सिंगल घ्यायचा होती, पण सूर्याने त्याला सिंगल घेण्यापासून रोखलं. रहाणेनं आपलं शतक पूर्ण करावं यासाठी सूर्यानं असं केलं. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात होता. सूर्याचा हा त्याग पाहून चाहत्यांना खूपच आनंद झाला. संपूर्ण स्टेडियमनं त्याच्या नावाचा जयजयकार केला. मात्र दुर्दैवानं रहाणेला आपलं शतक पूर्ण करता आलं नाही.
रहाणेनं पुढच्या चेंडूवर चौकार मारून 98 धावांपर्यंत मजल मारली. पण तो शतक पूर्ण होण्यापूर्वीच बाद झाला. रहाणे 56 चेंडूत 98 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 5 षटकार लगावले. रहाणेला विष्णू सोलंकीनं झेलबाद केलं. यानंतर पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादव बाद झाला. अखेर सुर्यांश शेडगेनं षटकार ठोकत मुंबईला सहा गडी राखून विजय मिळवून दिला.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 158 धावा केल्या होत्या. शिवालिक शर्मानं नाबाद 36 धावांची खेळी खेळली, तर क्रुणालनं 24 चेंडूत 30 धावा केल्या. सलामीवीर शाश्वतनं 29 चेंडूत 33 धावा केल्या. हार्दिक पांड्या 6 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. मुंबईसाठी सूर्यांश शेडगेनं चार षटकांत 25 धावा देत दोन गडी बाद केले. याशिवाय मोहित अवस्थी, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, तनुष कोटियन आणि अथर्व यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मुंबईनं 17.2 षटकात 164 धावा करत सामना जिंकला. कर्णधार श्रेयस अय्यरनं 45 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे सध्या जोरदार फार्मात असून तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
हेही वाचा –
पॅट कमिन्सचा भारतीय संघाला इशारा, गाबा कसोटीत ऑस्ट्रेलिया या घातक प्लॅनसह खेळणार
अजिंक्य रहाणेच्या झंझावातात हार्दिक पांड्याचा संघ उडाला! मुंबईची फायनलमध्ये धडक
विराट कोहली गाबामध्ये पूर्ण करणार ‘अनोखं शतक’, सचिननंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू!